सतत आजारी असणाऱ्या आईवर मुलानेच गोळी मारून तिला ठार केले. नंतर कास परिसरात जाऊन स्वत:वरही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची करुणजनक घटनेने सदर बाजार भागातील रहिवाशांना शनिवारी धक्का बसला.
सदर बझार भागातील सत्यम सहगृहनिर्माण संस्थेतील ए-५ विंगमध्ये राहणाऱ्या लता राजन वाडकर (वय ५०) या सतत आजारी असायच्या. त्यांच्या पतीचेही नुकतेच निधन झाले होते. वडिलांचा आधार नाही आणि कर्जबाजारीपणामुळे आईवर उपचारही करता येत नाहीत यामुळे त्यांचा मुलगा कुणाल (वय ३०) याला नैराश्याने ग्रासले होते. कर्जबाजारीपणातून मार्ग निघत नसल्याने कंटाळून कुणाल याने दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी आईवर गोळी झाडली. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. दुपारी दोनच्या सुमारास कास येथील सिद्धी विनायक मंदिराजवळ गाडी उभी करून स्वत:च्या डोक्यात त्याने गोळी झाडून घेतली. त्यानंतर या दोन्ही घटना उघडकीला आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घ्यायचे काम सुरू होते.