नगर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पारनेर महाविद्यालयास दक्षिण आशियाई शिक्षण परिषदेचा ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनाही शिक्षण परिषदेकडून ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दक्षिण आशियातून एकूण २५९ नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून उत्कृष्ट महाविद्यालय व आदर्श प्राचार्य असे दोन पुरस्कार पारनेर महाविद्यालयास जाहीर झाले आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयाने राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, प्राध्यापकांचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांनी केलेले समाजाभिमुख काम याचा विचार करून हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी विकास मंडळ पुरस्कार, महाविद्यालयाच्या चेतना वार्षिक अंकास उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्कार असे विविध पुरस्कार पारनेर महाविद्यालयाला यापूर्वी प्राप्त झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांना यापूर्वी आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. आहेर यांचे शंभरपेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून महाविद्यालयात त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे, सचिव जी. डी खानदेशे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. आहेर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South asian education council award college ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST