जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र नित्कृष्ट प्रतीच्या सोयाबीन बियाणांमुळे मोठय़ा क्षेत्रातील पेरणी वाया गेली आहे. शेतकऱ्यांच्या  तक्रारी येऊनही अद्यापही कृषी विभागाने गांभीर्याने हे घेतले नसून नित्कृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाबीजसह राज्यात पन्नास बियाणे कंपन्या सोयाबीन बियाणाची विक्री करते. या बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना सिड प्लॉट देतात. तयार होणाऱ्या बियाणांपैकी नगर व बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक बियाणे शेतकरी तयार करतात. कंपन्या हे बियाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. नगर व बुलढाण्यात पन्नास टक्के सोयाबीन बियाणे तयार होते. त्या खालोखाल नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूरसह सर्वत्र थोडय़ा प्रमाणात बियाणे तयार होते. बियाणे निर्मितीत महाबीजचा ३० टक्के वाटा आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत परतीचा पाऊस मोठय़ा प्रमाणात झाला. त्यामुळे सोयाबीनचे दर्जेदार बियाणे तयार झाले नाही. सोयाबीनच्या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला.

यंदा कपाशी व मका पिकाखालील क्षेत्र कमी झाले असून सोयाबीनकडे शेतकरी वळाले आहेत. त्यामुळे सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण झाला.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडेही मर्यादित स्वरुपात बियाणे होते. त्यांचे हे बियाणे प्लॉट वाया गेले. दरवर्षीपेक्षा कमी बियाणे तयार झाले. खासगी कंपन्यांकडे केवळ ३० टक्केच बियाणे होते. मात्र अनेक कंपन्यांनी बियाणात उखळ पांढरे करण्याकरिता विदर्भातील अनेक बाजार समित्यांमधून सोयाबीन बियाणे खरेदी केले. ते तीस किलोच्या पिशव्यांमध्ये भरुन विकले. मराठवाडयातील काही कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याखेरीज मध्यप्रदेशातील खांडवा व इंदोर भागातून बियाणे मोठय़ा प्रमाणात आले. विशेष म्हणजे स्वत:चे प्रक्षेत्र नसताना व नोंदणीकृत शेतकरी नसताना या कंपन्यांनी बियाणे विकले. हे बियाणे नित्कृष्ट प्रतीचे निघाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले पण ते उगवलेच नाही.

कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, राहाता, राहुरी या भागात सोयाबीनचे बियाणे नित्कृष्ट निघाले आहेत. काही कंपन्यांचे सोयाबीन उगवलेलेच नाही. महाबीज व राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणे उगवले. मात्र या कंपन्यांचे बियाणे उगवले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राच्या चालकांकडे तक्रारी केल्या. काही चालकांनी बियाणे पुन्हा मोफत दिले. तर काही चालकांनी वर हात केले. कंपन्यांनी नित्कृष्ट बियाणे पुरविल्यामुळे आम्ही बियाणे बदलून देत नाही. तुम्ही कारवाई करा. कृषी विभागाकडे तक्रारी करा, असे सांगितले. एका कंपनीचा कर्मचारी कोपरगाव भागात शेतकऱ्याच्या शेतावर पहाणी करण्यासाठी गेला असता त्याला कोंडून ठेवण्यात आले. मात्र कृषी सेवा केंद्राच्या चालकाने मध्यस्थी करुन त्याची सोडवणूक केली. आता नफेखोरी करणाऱ्या या कंपन्यांनी कृषी विभागातील उच्च पदस्थाना हाताशी धरले असून कारवाई टाळण्यासाठी पहाणी सुरु केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean sowing is wasted due to poor quality seeds abn
First published on: 22-06-2020 at 00:22 IST