लातूर : नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या वेळेस प्रथमच हमीभावापेक्षा अधिक भावाने सोयाबीन विकले जाणार आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल चार हजारांच्या पार गेला आहे.

दरवर्षी सोयाबीन बाजारपेठेत आल्यानंतर हमीभावापेक्षा कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. यात छोटा शेतकरी नाडला जातो. चार महिन्यानंतर सोयाबीनचे भाव वाढतात. मात्र, त्याचा लाभ मोठे शेतकरी व व्यापाऱ्यांनाच होतो. शुक्रवारी लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल चार हजार ५० रुपये इतका होता. तर कीर्ती ऑइल मिलच्या कारखान्यातील खरेदीचा भाव चार हजार १८० असल्याचे अशोक भुतडा यांनी सांगितले.

देशात मध्य प्रदेशात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. यावर्षी अतिवृष्टीचा फटका मध्य प्रदेशातील ३० पेक्षा अधिक जिल्हय़ांना बसला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. बाजारपेठेत सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनला हा विक्रमी भाव मिळतो आहे. आठ दिवसांत नवीन सोयाबीन बाजारपेठेत दाखल होईल. शासनाने २०१९ च्या खरीप हंगामातील सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ७१० रुपये जाहीर केला आहे. पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येण्याच्या वेळेस हमीभावापेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थात यावर्षी लातूर परिसरातही पाऊस कमी असल्याने सोयाबीनचा पेरा कमी झाला व उत्पादकताही ५० टक्केपेक्षा कमी आहे. या स्थितीत किमान चांगला भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

लातूर जिल्ह्य़ात चार लाख हेक्टर सर्वसाधारण सोयाबीनचे क्षेत्र आहे. पण यावर्षी पेरणीच ७० टक्केच झाली. त्याला उशिराच्या पावसाचे कारण आहे. सुरुवातीच्या पावसावर केवळ २५ टक्केच पेरणी झाली होती. नंतर पावसाने दडी मारली. याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे.