आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात होईल. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडणूक सारखे अनेक सत्र या अधिवेशनदरम्यान पार पडणार आहेत. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाचे नेमके स्वरुप कसे असेल? घ्या जाणून

वंदे मातरम ने अधिवेशनाच्या कामकाजी सुरुवात होईल. त्यानंतर मंत्र्याचा परिचय दिला जाईल. परिचय सत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपाल सभागृहाला संदेश देतील. नंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत घोषणा केली जाईल.

विधानसभा अध्यक्षांची निवड
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीकडून उमेदरवांची नावे घोषित करण्यात आली आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीअगोदर भाजपा आणि शिंदे गटाकडून विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील भाजपाकडून आपला प्रस्ताव सादर करतील ज्यामध्ये नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर विधानसभा सदस्य चेतन तुपे त्यांच्या प्रस्तावाला अनुमोदन देतील.

तर महाविकास आघाडीकडून चेतन तुपे आपला प्रस्ताव सादर करतील. यात राजन साळवी यांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कामकाजाच्या अखेरीस शोक प्रस्ताव
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसातील कामकाच्या अखेरीस शोक प्रस्ताव सादर केला जाईल. माजी राज्यपाल काटीकल शंकरनारायण , विद्यमान विधानसभा सदस्य रमेश लटके, माजी मंत्री हुसेन दलवाई यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात येईल.