जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या १४ जागा वगळता अन्य सात जागांवरच नेत्यांचा राजकीय कस लागण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. ८ पर्यंत असली तरी, या हालचालींना उमेदवारी अर्जाच्या माघारीच्या वेळीच खऱ्या अर्थाने गती येईल, असे दिसते. विधिमंडळाच्या अधिवेशन संपल्यानंतर ही धांदल सुरू होईल.
जिल्ह्य़ात राजकीयदृष्टय़ा कमालीचे महत्त्व असलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. दि. ५ मेला ही निवडणूक होणार असून परवापासून (शनिवार) उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहे. ही मुदत दि. ८ पर्यंत आहे. मात्र तोपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशनच सुरू असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळीच खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना गती येईल, असे दिसते.
काँग्रेसअंतर्गत थोरात आणि विखे गटाच्या हालचालींकडेच जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी आणि थोरात गट अशी युती होऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांना शह दिला होता. आता या वेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेते यावर जिल्हा बँकेची बरीचशी गणिते अवलंबून आहेत. त्याची प्राथमिक जुळणी सुरू असली तरी, या हालचालींना अजूनही फारशी गती आलेली नाही.
विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या तालुकानिहाय १४ जागांपैकी श्रीरामपूर, राहुरी, पारनेर व जामखेड या चार जागांवर चुरस होईल, अशी चिन्हे आहेत. या सेवा संस्थांचे झालेले प्रतिनिधींचे ठराव लक्षात घेता उर्वरित १० तालुक्यांच्या जागेवर मात्र फारसा बदल होणार नाही असे दिसते. येथील उमेदवार आत्ताच ठरलेले असून त्यात बदल होण्याचीही फारशी शक्यता दिसत नाही. त्यामुळेच महिलांच्या २, विविध आरक्षणातील ३, बिगरशेतीची १ आणि शेतीपूरक संस्थांची १ अशा ७ जागांवरच सर्व नेत्यांचा कस लागेल. त्यावरच रस्सीखेच होण्याची चिन्हे असून याच जागा राजकीय तडजोडीत कोणाच्या वाटय़ाला जातात याकडे लक्ष आहे. या तडजोडींवरच जिल्हा बँकेची सत्ता ठरेल.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीतील बदलत्या राजकारणामुळे कोपरगाव, नगर, पाथर्डी येथे भारतीय जनता पक्ष आणि पारनेर येथे शिवसेना काय भूमिका घेते याकडेही लक्ष आहे. विशेषत: कोपरगाव, पाथर्डी व नगर येथील तीन जागांवर भाजपला संधी मिळू शकते. मात्र जिल्हा बँकेत पक्षीय राजकारणाला फारसे महत्त्व दिले जात नाही, त्यामुळे बँकेचे विद्यमान संचालक बिपीन कोल्हे, माजी आमदार राजीव राजळे व आमदार शिवाजी कर्डिले काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.