प्राथमिक शिक्षक बँकेपाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती व सांगली अर्बन बँकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षिय आघाडी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून याला मूर्त स्वरूप तासगावच्या पोटनिवडणुकीनंतर मिळणार असल्याचे संकेत मिळाले. तर सांगली अर्बनसाठी सत्ताधारी पुजारी यांना आ. सुधीर गाडगीळ यांचे बंधू गणेश गाडगीळ यांचे परिवर्तन पॅनेल आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
जिल्हा मध्यवर्ती आणि सांगली अर्बन बँकेच्या पंचवार्षकि निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून अनुक्रमे २१ व १७ संचालक निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा बँकेसाठी ५ व अर्बनसाठी १० मे रोजी मतदान होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदार २२०६ असून २१ संचालक निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी पक्षविरहित पॅनेल तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली असून भाजपाचे खा. संजयकाका पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तासगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सूतोवाच श्री.शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, सांगलीसह मराठवाडय़ातही मतदार असलेल्या सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. संघाच्या विचाराचा प्रभाव असणाऱ्या या वित्तीय संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी गणेश गाडगीळ हे परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. मात्र सत्ताधारी गटाचे बापूसाहेब पुजारी हे सहकारातील जाणकार म्हणून ओळख असणारे नेतृत्व सत्ताधारी गटाकडे आहे. या वेळी आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे असणारी आमदारकी या निवडणुकीत प्रभाव टाकणारी ठरणार का, हे लवकरच लक्षात येणार आहे. ५६ हजार ८९० सभासद असणाऱ्या या बँकेची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न गाडगीळ पॅनेल करीत असून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.