भरधाव वेगातील क्रुझर जीप गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतातून विहिरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना विहे ( ता. पाटण) येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गुहागर-पंढरपूर राज्य मार्गावरील या अपघाताने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाल्याने पोलीस व प्रशासनाची तारांबळ उडाली.

ही क्रुझर जीप पोलीस व विहे ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी क्रेनच्या साह्याने विहिरीबाहेर काढण्यात यश आले. मात्र, गाडीत कोणीही आढळून न आल्याने अपघातग्रस्तांचा शोध घेतला जात आहे. विहिरीतून गाडी बाहेर काढल्यानंतर (गाडी क्र. MH 50 A 6261) असल्याचे निदर्शनास आले. मात्र, या गाडीमध्ये कोणीही आढळून न आल्याने या अपघातातील अपघातग्रस्त किती, कोण व ते नक्की कोणत्या अवस्थेत असतील याबाबत अंदाज लागू शकला नाही.