सोलापूर : सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्यामुळे दाहकता वाढत असताना त्यात धावत्या वाहनांनाही आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. सोलापूरजवळ मंगळवारी दुपारच्या प्रखर उन्हात एका एसटी बसला अचानकपणे आग लागली. परंतु सुदैवाने बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बसमधील सर्व ४७ प्रवाशांना लगबगीने खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अलिकडे दुपारच्या तळपत्या उन्हात वाहनेही पेट घेत असल्याचे प्रकार घडत असल्यामुळे वाहनांतून प्रवास करणेही आता जिकिरीचे ठरत आहे. अलिकडे पहिली घटना सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी टोल नाक्याजवळ गाणगापूरहून कुर्डूवाडीकडे निघालेल्या एका एसटी बसला आग लागून त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली होती. त्यातील सर्व प्रवासी सुदैवाने बचावले होते.

त्यानंतर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भरदुपारी सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची प्रवासी बस अचानकपणे आग लागून संपूर्णतः जळाली होती. त्यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बसमधून खाली उतरविले होते. त्या पाठोपाठ शहरातील अतिवर्दळीच्या नव्या पेठेत धावत्या दुचाकीलाही आग लागली होती.

काही क्षणातच दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या तिन्ही घटना ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या एका एसटी बसलाही (एमएच २० बीएल ४२२६) आग लागली. तुळजापूर नाक्याच्या पुढे उड्डाणपुलाजवळ एसटी बसमध्ये चालकाच्या केबीनमध्ये इंजिनमधून धूर निघाला आणि काही क्षणातच आग लागली. यात बसचालकाची संपूर्ण केबीन जळून खाक झाली. दरम्यान, सोलापूर महानगरपालिका अग्निशमन यंत्रणेने धावून येऊन आग आटोक्यात आणली.