नगर : कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्यानंतर आता एसटी बसची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र अद्याप प्राधान्याने लांब पल्ल्याच्या व प्रवाशांचा अधिक प्रतिसाद असलेल्या पुणे, कल्याण, नाशिक या मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. संपापूर्वी जिल्ह्यात एसटी बसमधून रोज ८० ते ८५ हजार प्रवाशांची वाहतूक होत होती. सध्या ही संख्या हळूहळू वाढत रोज ६० ते ६५ हजारांवर पोचली आहे. संप दि. ४ नोव्हेंबरला पुकारण्यात आला. संपूर्ण नगर विभागातील वाहतूक त्यानंतर चारच दिवसांत, दि. ८ नोव्हेंबरला बंद पडली.
आता बडतर्फ केलेल्या ३८३ कर्मचाऱ्यांसह एकूण ३ हजार ८८५ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामध्ये १ हजार २१० चालक व १ हजार २८२ वाहकांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यात सहभागी आरोप असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अद्याप हजर करून घेण्यात आले नाही. संपापूर्वी जिल्ह्यातील आगारातून रोज ४८० बसच्या २ हजार १०० ते २ हजार २०० फेऱ्या होत होत्या. सुमारे ८० ते ८५ हजार प्रवाशांची वाहतूक रोज होत होती. ती आता जवळपास पूर्ववत होऊ लागली आहे. सध्या १ हजार ३०० ते १ हजार ४०० फेऱ्या होत आहेत.
अनेक बसच्या बॅटरी बदलल्या
सुमारे सहा महिन्यांच्या संपकाळात एसटी बस जागेवर उभ्या असल्यामुळे त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. बससेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर बॅटऱ्या नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यात बस बंद पडण्याची उदाहरणे घडत होती. त्यामुळे मोठय़ा संख्येने बॅटऱ्या बदलण्यात आल्या. देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर हे प्रमाण आता कमी झाले आहे.
अष्टविनायक यात्रा सुरू
प्रवाशांची मागणी असलेली अष्टविनायक यात्रा प्रत्येक आगारातून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कोकण दर्शन बसही पुन्हा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार पंढरपूर, अक्कलकोट यात्राबसची नोंदणी केली जात आहे.
शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे ग्रामीण भागात एसटी बसची सेवा अद्याप पूर्ववत सुरू केली गेली नाही. ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे, अशा लांब पल्ल्याच्या बस प्राधान्याने सुरू करण्यात आल्या आहेत. संप सुरू झाला, त्या वेळी डिझेलचा दर ८४ रुपये प्रति लिटर होता, आता तो १०४ रुपये झाला आहे. मात्र एसटी बसचे भाडे पूर्वीइतकेच आहे. संपकाळात प्रवाशांना खासगी वाहतूकदारांनी दिलेल्या त्रासाची आठवण असेलच, त्यामुळे प्रवाशांनी पुन्हा एसटी बसमधील सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे. – विजय गीते, विभाग नियंत्रक, नगर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus traffic employees strike st bus district amy
First published on: 27-04-2022 at 01:28 IST