संगमनेर : एसटीच्या चालकाने बसमध्येच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रकार आज सकाळी संगमनेर बसस्थानकात उघडकीस आला. लोकांकडून घेतलेले हातउसने पैसे परत वेळेत देऊ न शकल्याने आलेल्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभाष शिवलिंग तेलोरे (वय ४२, रा. कोल्हार कोल्हुबाई, ता. पाथर्डी. जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. काल, सोमवारी ते नियमित प्रमाणे कामावर हजर झाले होते. पाथर्डी ते नाशिक या बसवर चालक म्हणून त्यांची ड्युटी लागली होती. त्यानुसार त्यांनी काल (एम.एच.१४ बी. टी ४८८७) ही बस पाथर्डी आगारातून ताब्यात घेतली व नाशिकच्या दिशेने रवानाही झाले. मात्र काही कारणाने बस संगमनेर आगारातच मुक्कामी थांबली. वाहक व चालक बस मध्येच झोपले होते. आज पहाटे वाहक प्रातर्विधीसाठी बसमधून बाहेर पडले. त्यानंतर तेलोरे यांनी सुती दोरीने बसच्या छताला मधोमध असलेल्या लोखंडी पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. आपल्या मुलाच्या नावाने लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी ज्यांच्याकडून आपण उसने पैसे घेतले होते त्यांच्या नावासह रकमा लिहिलेल्या आहेत. आपल्या मृत्यूनंतर एसटीकडून जे पैसे मिळतील त्यातून ही देणी द्यावीत असेही त्यात म्हटले आहे.

‘अर्धी भाकर खा पण सुखी राहा’

आपल्या मोठ्या मुलाच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत तेलोरे यांनी म्हटले आहे की, कष्टाने कमवा, कोणालाही दुखवू नका, सर्वांशी प्रेमाने वागा. फार मोठे होण्याच्या नादी लागू नका. अर्धी भाकर खा पण सुखी राहा. विशेष म्हणजे ‘हा जन्म पुन्हा पुन्हा नाही’ असाही उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St driver commits suicide in bus akp
First published on: 21-09-2021 at 23:23 IST