मुंबई: पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २६ ऑगस्टला जमा केले जाईल.
गणेशोत्सवाला २७ तारखेपासून सुरुवात होत आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेता मासिक वेतन सहा दिवस आधीच देण्याचे ठरवले आहे. या निर्णयाचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषिक विद्यापीठे, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.