सांगली : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ गुंड आणि पोलीस यांच्या जोरावर चालले असून याला तोंड देण्यासाठी कायदेतज्ज्ञांची फौज तयार ठेवावी लागणार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत केली.

सांगलीमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदीसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना आ. पाटील म्हणाले,की राज्य सरकार केवळ गुंड प्रवृत्तीच्या आणि पोलिसांच्या जोरावर चालले आहे. यामुळे विरोधकांना यापुढील काळात वकिलांची फौज बाळगावी लागणार आहे. मुंबईमध्ये अदृश्य वकिलांचे पथकच कार्यरत झाले आहे. महाविकास आघाडी सरकारकडे काम करण्याची इच्छाशक्तीच नाही आणि सरकारमधील लोकांना कळतही नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बोलण्याची शैलीच तशी आहे. ही शैली शिवसेनेतीलच आहे. आम्ही हुशार राजकारणी आहोत. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्याची वेळ आता गेली असून जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. अनिल परब यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही असे सांगून आ. पाटील म्हणाले, या पुढील सर्व निवडणुका भाजप पक्ष म्हणून लढवेल. पक्ष मोठा असल्याने भांडण, वाद असणारच, हे तर पक्ष जिवंत असल्याचेच लक्षण आहे. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी कोणाच्या हाती सापडत नाहीत. ज्याठिकाणी अन्याय होतो तेथे ते बोलतातच. आमच्यासोबत असतानाही ते टीका करीत होतेच, आताही ते टीका करतात असेही आ. पाटील म्हणाले.