नंदुरबार : जिल्ह्यातील पीडिता अत्याचार आणि खून प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. या प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. दुसरीकडे, पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन झाल्यानंतर मुंबईहून धडगाव तालुक्यातील खडक्या येथे सायंकाळी मृतदेह आला. पीडितेचे नातेवाईक प्रवासात असल्याने ते रात्री उशिरापर्यंत गावी न पोहचल्याने गावकऱ्यांनी मृतदेह पुन्हा मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू आणि दीड महिन्यांपेक्षा अधिक दिवस मृतदेह अंत्यसंस्कारविना राहण्याच्या प्रकाराविषयी लोकसत्तातून येणाऱ्या बातम्यांचा विशेषत्वाने उल्लेख करुन राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाकडे पाठवावा, अशी सूचना केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस महानिरीक्षकांनी विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला. धडगाव तालुक्यातील खडक्या येथे आदिवासी विवाहितेचे काही जणांनी अपहरण करून अत्याचारानंतर तिचा खून केल्याचा संशय आहे.

स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनातील निष्कर्षांनी समाधान न झालेल्या पीडितेच्या वडिलांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या मागणीसाठी तब्बल ४५ दिवस मृतदेह मिठाच्या खड्डय़ात पुरुन ठेवला होता. ४५ दिवसांनी मृतदेह बाहेर काढून पोलीस प्रशासनाने पीडितेच्या कुटूंबियांच्या मागणीप्रमाणे विच्छेदनासाठी मुंबईत जे.जे. रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मृतदेह घेऊन काही जण गावी परतले. परंतु पीडितेचे वडील आणि इतर नातलग रात्री उशिरापर्यंत गावी पोहचू न शकल्याने गावकऱ्यांनी मृतदेह पुन्हा मिठाच्या खड्डय़ात पुरला. शनिवारी पीडितेचे नातेवाईक अंत्यसंस्काराविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार संवेदनहीन : राष्ट्रवादीची टीका राज्यातील ईडी सरकार हे संवेदनहीन असून धडगावमधील घटना महाराष्ट्राच्या प्रशासनाला काळीमा फासणारी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तपासे यांनी शुक्रवारी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील पीडिता अत्याचार आणि खून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत कठोर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. राज्यात इतकी संवेदनशील घटना घडत असतांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सत्तेच्या धुंदीत मस्त असून त्यांना याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जी तत्परता पोलीस विभाग आज दाखवत आहे ती आधीच दाखवली गेली असती तर पीडितेला जलद न्याय मिळाला असता. या घटनेतील दोषींवर आणि यंत्रणेत त्रुटी ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी तपासे यांनी केली.