शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. याठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. मनुवादी अस्त्रांपासून सावध राहण्याचं आवाहनही सुषमा अंधारेंनी यावेळी केलं.

उपस्थित नागरिकांनी उद्देशून केलेल्या भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्या (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहे. बाबासाहेबांनी एक विचार लिहून ठेवला आहे की, जेव्हा तुमचं काम प्रचंड प्रभावी पद्धतीने वाढत असतं, तेव्हा लोक पहिल्यांदा तुम्हाला धाक दाखवतात. तुम्हाला धमक्या देतात, तुम्हाला घाबरवतात.”

हेही वाचा- जे पोटात होतं ते ओठावर आलं; अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच, भर पत्रकार परिषदेत घडला किस्सा

“पण जर तुम्ही त्यांच्या धाकाला घाबरला नाहीत किंवा त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही. तर ते दुसरं अस्त्र बाहेर काढतात, ते तुमच्याबद्दल अफवांचं राजकारण करतात. तुमच्याविषयी भ्रम निर्माण करतात. पण लोक भ्रमितही झाले नाहीत, तर ते तिसरं अस्त्र काढतात. तिसरं अस्त्र म्हणजे ते तुमचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न करतात. भय, भ्रम आणि चरित्रहनन ही तीनही मनुवादी अस्त्रं आहेत. यापासून सावध राहा” असं आवाहन सुषमा अंधारेंनी केलं आहे.

हेही वाचा- “अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथे होणारी ही सभा उधळून लावण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिली होती. अलीकडेच अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ही सभा उधळून लावणार आहोत, अशी भूमिका मनसेचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी घेतली होती. पण सुषमा अंधारेंनी या धमकीचं स्वागत करत त्याच ठिकाणी सभा होणार, असं सांगितलं होतं. त्यानुसार उस्मानाबादेत सुषमा अंधारेंची सभा पार पडली आहे.