निफाडमधील अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या आयुष्याची चित्तरकथा ; आजी-आजोबांवर कुटुंबाचा भार

तरुण शेतकरी मुलाने आत्महत्या केल्यामुळे आजी-आजोबांना नातवासाठी आई-वडिलांच्या भूमिकेत जावे लागले. उतारवयात त्यांच्यावर शेती, त्यावरील कर्जापायी उन्हातान्हात शेतात राबण्याची वेळ आली तर वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे कोणाला अध्र्यावर शिक्षण सोडून शेतकरी व्हावे लागले. अशाच अन्य घटनेत वडिलांनी गळफास घेतल्यानंतर शुल्क देण्यास पैसे नसल्याने महाविद्यालय व्यवस्थापनासमोर हाता-पाया पडत अगतिक व्हावे लागले. शुल्क भरण्यास मुदत नाकारल्याने त्यांना पुन्हा खासगी कर्ज उचलावे लागले.. गोदावरीच्या काठावर वसलेल्या शेतीसमृद्ध निफाड तालुक्यातील ही प्रातिनिधीक उदाहरणे.

काही वर्षांपूर्वी विदर्भ व मराठवाडय़ात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिकची वाटचाल आता त्याच दिशेने होत असल्याचे  लक्षात येते. द्राक्ष, कांदा, सोयाबीन, ऊस, भाजीपाला अशा पिकांनी बहरलेल्या निफाड तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा प्रकरणात शासकीय निकषात बसणाऱ्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत दिली जाते. निकषात न बसणाऱ्या कुटुंबीयांना तो आधारही मिळत नाही. उपरोक्त उदाहरणे शासकीय मदत मिळू न शकलेल्या शेतकरी कुटुंबीयांची आहेत. जाचक निकषांमुळे वर्षभरात निम्मे प्रस्ताव नामंजूर होतात, असे शेतकरी बचाव अभियानचे राम खुर्दळ व प्रकाश चव्हाण यांचे निरीक्षण.

कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेले संकट भयावह आहे. सोनगाव हे निफाडमधील जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. या एकाच गावात मागील तीन वर्षांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. टोकाचा निर्णय घेणारे सुटले, पण त्याची किंमत कुटुंब मोजत आहे.

साठी गाठणारे पुंजा गाडे हे त्याचे उदाहरण. त्यांचा मुलगा महेंद्रने गळफास घेतला. या घटनेनंतर पत्नी दोन वर्षांच्या वेदिकाला सासरी सोडून निघून गेली. आई सांभाळत नसल्याने आजी-आजोबांना चिमुरडीचे कायदेशीर पालकत्व स्वीकारावे लागले. मुलाचे थकीत कर्ज, गहाण ठेवलेले दागिने, शेती भांडवलासाठी सोसायटीचे कर्ज असे त्यांना सात लाखाचे देणे आहे. दीड एकर शेतीतून हे कर्ज कसे फेडायचे अन् वेदिकाचा सांभाळ कसा करायचा, या प्रश्नांनी आजोबा चिंताक्रांत आहेत. आई-वडिलांच्या मायेला पारख्या झालेल्या वेदिकासाठी वृद्धापकाळात त्यांना पत्नीसह शेतात राबावे लागत आहे. याच गावातील लक्ष्मण गावले या २४ वर्षीय तरुणास परिस्थितीने शेतकरी बनवले. सलग दोन-तीन वर्ष शेतातून उत्पन्न न मिळाल्याने त्याचे वडील सोमनाथ यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढत गेला. ढासळलेल्या मानसिक अवस्थेत त्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. चांदोरी महाविद्यालयात इयत्ता बारावीत असणाऱ्या लक्ष्मणला शिक्षण अध्र्यावर सोडावे लागले. कर्ज फेडण्यासाठी काही जमीन विकली. मात्र, तीन लाखाचे कर्ज अद्याप बाकी आहे. दोन वर्षांत शेतातून पीक काढले. मात्र उत्पादन खर्चदेखील मिळत नसल्याने कर्जाचा भार ‘जैसे थे’ असल्याचे लक्ष्मण सांगतो.

वऱ्हेदारणा येथे खोलीत राहणाऱ्या जाधव कुटुंबीयांची भेंडाळी येथे शेतजमीन आहे. शेतीवर भागत नसल्याने वडील गावात भाडेतत्वावर केशकर्तनालय चालवायचे. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर उत्पन्न बंद झाले अन् कुटुंबावर अरिष्टे कोसळण्यास सुरुवात झाली. मुलगा उद्देशचे महाविद्यालयीन शिक्षण शुल्क भरण्यासाठी १२ हजार रुपये नव्हते. आईने रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ते भरण्यासाठी मागितलेली मुदत नाकारण्यात आली. शेती आजोबांच्या नावे असल्याने कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. वडिलांनी नवनाथ पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा तगादा सुरू झाला. शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याने आई वनिता यांनी नव्याने खासगी कर्ज उचलत ती रक्कम कशीबशी भरली. महाविद्यालयाने असंवेदनशीलपणा दाखविला, पण ज्या खासगी शिकवणीत उद्देश शिक्षण घेत होता, त्यांनी जेव्हा शक्य होईल तेव्हा शुल्क भरण्यास संमती दिल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अखेर मित्राच्या नावावर वाचनालयातून तात्पुरत्या स्वरुपात पुस्तके घेतल्याचे उद्देशने सांगितले. केशकर्तनालयाच्या दुकानावर हे कुटुंबिय चरितार्थ चालवण्याची धडपड करत आहे.

संस्कारची अशीही धडपड

चितेगावच्या विठ्ठल विश्वनाथ गाडे यांचा मुलगा संदीपने दीड वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेनंतर नातू संस्कार आईसोबत तिच्या माहेरी जाण्यास तयार नव्हता. तो आजी-आजोबांसोबत राहतो. शेतीसाठी मुलाने सोसायटीकडून घेतलेले दीड लाखाचे कर्ज आजोबांनी निवृत्तिवेतनापोटी मिळालेल्या पैशातून भरले. दीड एकर शेतात आजोबा गहू, सोयाबीन व तत्सम पिके करतात. अर्धागवायूने आजारी आजीला घरकामात हातभार लावणारा अकरा वर्षीय संस्कार आजोबांना शेतात गव्हाचे पोते भरू लागतो. आयुष्याच्या सायंकाळी नातवाचे आई-वडील बनलेल्या आजी-आजोबांना कृषिमाल बाजारात नेऊन विकणे शक्य नाही. त्यामुळे बाजारात गव्हाला २३०० रुपये भाव असूनही शेतात त्यांना केवळ १६०० रुपये (१०० किलोचे पोते) दराने तो विकावा लागल्याची खंत गाडे कुटुंबीयांनी व्यक्त केली. आई-वडिलांना सांभाळण्याची जी जबाबदारी वडील पेलू शकले नाहीत, ती संस्कार चिमुकल्या हातांनी पेलण्याची धडपड करतो.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.