नगर शहराची शांतता बिघडवणा-या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी तसेच शांततेला व अर्थकारणाला बट्टा लावणा-या घटनेमागे कोणाचा चेहरा आहे, याचाही शोध घ्यावा. जे निरपराध असतील त्यांची पोलिसांनी मुक्तता करावी, अशा मागणीचे निवदेन प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिका-यांना दिले.
प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, युवकचे शहराध्यक्ष गौरव ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब भुजबळ, फिरोज खान, पीयूष लुंकड, स्वप्नील दगडे, अमन तिवारी आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन देऊन मागणी केली.
निवेदनात म्हटले, की शहरातील शांततेला धक्का लावणारी घटना नुकतीच रामनवमी उत्सव काळात घडली, शहराचे वातावरण पूर्णत: ढवळून निघाले व आजही नगरकर दहशतीच्या वातावरणात आहेत. ही दंगल पूर्वनियोजित होती, असा संशय आहे. शहराच्या भविष्यासाठी हे चिंताजनक आहे. नगरकर यापूर्वीही अनेक वेळा जातिपातीच्या राजकारणाला बळी पडले आहेत. त्याचा शहराच्या प्रगतीला मोठा अडसरही झालेला आहे. कालच्या घटनेतही काही जातीयवादी संघटनांनी धर्माच्या नावाखाली शहराची शांतता वेठीला धरली आहे. जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये केली गेली.
दंगल घडावी ही समाजकंटकांची इच्छा होती व त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीही केली होती. समाजकंटकांच्या या प्रवृत्तीला राजकीय पाठबळही असल्याचाही संशय आहे. समाजकंटकांनी व्यापा-यांना धमकावले, बळजबरीने व्यापार बंद केला, अशा भीतीच्या वातावरणात शहरातील व्यापार कसा विकसित होणार, जनता स्वत:ला सुरक्षित कसे समजणार, यासाठी कालच्या घटनेमागील खरा चेहरा कोणाचा आहे, याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action should be on vermin
First published on: 01-04-2015 at 03:45 IST