लोकसत्ता वार्ताहर

परभणी : पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातल्या मुख्य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दैनंदिन व्यवहार बंद राहिले. दरम्यान आज सायंकाळी येथे महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते.

आज गुरुवारी (दि.२४) सकाळपासूनच शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद होते.छत्रपती शिवाजी चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. रामेश्वर नाईक, आनंद भरोसे, डॉ. विवेक नावंदर, अनंत पांडे, अनिल डहाळे, संदीप भंडारी, राजकुमार भांबरे आदींसह अनेकजण यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेचा आज शहरातील मुख्य चौक, क्रांतीचौक, गुजरी बाजार, नानलपेठ आदी व्यापारी भागात छोटी मोठी सर्व दुकाने बंद होती.

याप्रकरणी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यावतीने घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी निरपराध जिवांचा बळी घेतला आहे. हा हल्ला निंदनीय व भ्याड असून केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरूध्द कठोर पावले उचलावीत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने परभणीत याप्रकरणी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. दहशतवाद्यांचा समूळनायनाट करण्यात यावा अशी मागणी यावेळी अ.भा.च्या वतीने प्रदेश सहमंत्री सुशांत एकोरगे, अमरजा नरवाडकर, गायत्री लाड आदींनी केले.

मोहमदी सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने पहलगाम येथील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल कादर, सय्यद वसीम, फेजुल्लाखान पठाण आदींनी केली. काँग्रेसच्या वतीने याप्रकरणी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. दोषी अतिरेक्यांविरूध्द तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव आदींनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अ‍ॅड. माधुरी क्षिरसागर, ओंकार पवार, अ‍ॅड. लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, शेख अब्दुल यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. अतिरेकी संघटनांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी स्विकारून देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.