धाराशिव/तुळजापूर : तुळजाभवानी देवीचा दर्शन मंडप आणि विकास आराखड्यावरून तुळजाभवानी भक्त विकास आराखडा कृती समितीने बुधवारी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कुलस्वामिनी तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. परिणामी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बंदमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.

तुळजापूर शहरात तुळजाभवानी देवीचा दर्शन मंडप आणि मंदिर संस्थानची प्रशासकीय कार्यालय इमारत प्रस्तावित विकास आराखड्याप्रमाणे न करता, उंबरझरा या जागेत करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने लावून धरली आहे. या मागणीसाठी बुधवारी कृती समितीने बंद पुकारला होता. या बंदमध्ये तुळजापूर शहरातील व्यापार्‍यांसह सर्व घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. आपली दुकाने बंद ठेवून व्यापारी आणि व्यावसायिकांनी बंदला मोठा प्रतिसाद दिला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पदयात्रा काढण्यात आली. राजे शहाजी महाद्वारासमोर या पदयात्रेची सांगता झाली. महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असलेले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना सद्बुद्धी दे, असे साकडे तुळजाभवानी देवीकडे घालून महाद्वारासमोर महाआरती करण्यात आली.

हेही वाचा – दुचाकीने शाळेला जाताना शिक्षिकेला अडवून लुटले

दर्शन मंडप प्रशासकीय इमारत उंबरझरा याच ठिकाणी करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांना विस्थापित न करता, विकास आराखडा अंमलात आणावा, असेही या कृती समितीचे म्हणणे आहे. त्यासाठी बंद पाळण्यात आला होता. दरम्यान तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अचानक पुकारलेल्या या बंदमुळे गैरसोयींना सामोरे जावे लागले. तुळजाभवानी भक्त विकास कृती आराखडा समितीच्या पदाधिकार्‍यांसह काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि तिन्ही पुजारी मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी तुळजापूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

कर्नाटकच्या भाविकांची गैरसोय

एक दिवस अगोदर बंदचा इशारा देण्यात आल्यामुळे माध्यम व समाजमाध्यमांतून राज्यातील भाविकांपर्यंत तुळजापूर बंदची माहिती पोहोचली होती. त्यामुळे राज्यातील भाविकांची बुधवारी दर्शनासाठी संख्या नगन्य होती. नवरात्रौत्सवाच्या पूर्वी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक राज्यातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. या बंदबाबत कर्नाटकातील भाविकांना कोणतीही पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटक राज्यातील भाविकांना या बंदचा फटका सहन करावा लागला.

तुळजाभवानी मंदिराला आता जिल्हाधिकारी दर्जाचा सीईओ

तुळजाभवानी मंदीर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने तसा आदेश जारी केला आहे. शिर्डी देवस्थानप्रमाणे आता तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍याची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदीर संस्थानचा प्रशासकीय कारभार मंदीर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांंच्या देखरेखीखाली तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांकडून केला जात होता. शिर्डीप्रमाणे तुळजाभवानी मंदीर समितीचा कारभार पाहण्यासाठी आयएएस दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांची तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – VIDEO: “कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक आले की कार्यकर्त्यांवरील…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधी व न्याय विभागाच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेल्या या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर धाराशिवचे अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा पदभार पूर्णवेळ शिंदे यांच्याकडे राहणार आहे. पूर्णवेळ अधिकार्‍याच्या नियुक्तीचे आदेश आल्यानंतर हा पदभार आपोआप संपुष्टात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.