राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विद्यार्थ्यांला मुंबईत आणून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये अजून काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

गणेश नारायण गोटे असं या २९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. त्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासहब महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबत ट्विटरवर अपशब्द वापरले होते. यानतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.

ट्विटरच्या एका अकाऊंटवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार आणि महिला पत्रकार यांच्याविषयी अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याबद्दल १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सायबर येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शोध घेऊ नये, यासाठी आरोपीने सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट, व्हीपीएनचा वापर करुन अपशब्द असलेला मजकूर प्रसारित केला होता.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे नगर येथील राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी मुंबईत आणण्यात आले. तपासाअंती गणेश गोटे (२९) वर्षे याला अटक करण्यात आली. तपासात दोन मोबाइल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आले. त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन संशियताने प्रसारित केलेला मजकूर आणखी कोणाकडून तयार करुन घेतला आहे का, याबाबत तपास सुरु आहे.

न्यायालयाने या आरोपीला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, यशस्वी यादव, पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले हे करत आहेत.