अभ्यासाच्या नावाखाली मुलांना १५ प्रकारचे आजार देणारे दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून १२ वषार्ंच्या ऋग्वेद राईकवार या विद्यार्थ्यांने रविवारी महात्मा गांधी जयंतीला संविधान चौकात उपोषण सुरू केल्याने शिक्षण यंत्रणा हादरली. उपोषण सोडावे म्हणून स्वत: शिक्षण उपसंचालकांनी त्याची मनधरणी करू लागली. मात्र, ‘दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या संदर्भात व्यापक जनजागरण मोहीम सुरू करण्यात येईल’, असे लेखी आश्वासन घेतल्यानंतरच ऋग्वेदने उपोषण मागे घेतले आणि उपसंचालक कार्यालयाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
ऋग्वेद हा चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेत सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे. दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखी, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मणक्याची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण, डोके दुखी यासारखे १५ प्रकारचे आजार होत असल्याने अभ्यासाच्या नावाखाली मुलांवर लादण्यात येणारे ओझे कमी करण्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जुलै २०१५मध्ये शासन निर्णय निर्गमित केला. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेली नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून ऋग्वेदने उपोषण करण्याचा संकल्प सोडला. मात्र, लहानगा ऋग्वेद काय उपोषण करणार? म्हणून प्रशासनाने त्याच्याकडे कानाडोळा केला. मात्र ठरल्याप्रमाणे त्याने एक ऑक्टोबरला नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन उपोषणाची परवानगी मागितली आणि निश्चयी ऋग्वेदने आंदोलन सुरू केले.
गांधी जयंतीला त्याने उपोषण सुरू केल्याबरोबर येथील यंत्रणा हादरली आणि मुंबईतील वरिष्ठांशी संपर्क साधून ‘त्या’ शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीचे आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यास तो तयार झाला. शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी फळांचा रस पाजून त्याचे उपोषण सोडवले. ऋग्वेदचा कैवार घेत सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी शिक्षण विभागाशी बोलणी करून संबंधित लेखी आश्वासन मिळवण्यास यश मिळवले.
