आप्पासाहेब शेळके, औरंगाबाद

गाढेजळगावात ९० शेततळ्यांमुळे चारचाकी गाडय़ांची रेलचेल!

leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड

शेततळ्याचा लाभ किती? – उत्तर हवे असेल तर औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगावमधील तरुण शेतकरी हरी देवीदास ठोंबरे यांना विचारा. २०१२च्या दुष्काळात जसे शिवार उघडे पडले, तसे चेहरेही काळवंडले. दावणीला बांधलेली जनावरे कोणी विकली, तर कोणी नातेवाईकांकडे पाठवून दिली. दोन एकरांवर लावलेली मोसंबीची बाग करपून गेली होती. आता पुढे काय, हा प्रश्न हरी ठोंबरे यांच्यासमोर होता. २०१३ मध्ये २२ गुंठय़ांवर त्यांनी शेततळे घेतले. त्यावर मोसंबीची बाग तर तरलीच. आता दोन एकरांत डाळिंब आहे. पावसाळ्यात शेततळे भरले. आता सुबत्ता एवढी आली आहे की, ठोंबरे यांना शेतीतील तंत्रशुद्ध शिक्षण घ्यावे असे वाटते आहे. त्यांनी मुक्त विद्यापीठात प्रवेशही घेतला आहे. गाढेजळगाव या छोटय़ा गावात ठोंबरे हे एकटे शेतकरी नाही. गावात ८० ते ९० शेततळे पाण्याने भरले आहे आणि सव्वा लाख डाळिंबाची लागवड झाली आहे. एका एकरात चारशे झाडांची लागवड होते. गावात आता चारचाकी गाडय़ांची रेलचेल आहे. गाव बदलतो आहे. कारण शेततळे.

पूर्वी ठोंबरे यांच्या शेतात मका आणि ज्वारी एवढेच पीक होत. पुढे फळबाग लागवडीला सुरुवात झाली. मग शेततळ्यांचे महत्त्व दुष्काळात समजले आणि  ठोंबरे यांनी सव्वा एकर जमिनीवर दोन शेततळी घेतली. त्यातील पाण्यावर दोन एकर मोसंबी, चार एकर डाळिंब आणि दोन एकर द्राक्ष बाग ही फळपिके जोपासली. तीन सुना आणि त्यांचे कुटुंब या बागेत काम करतात. सुरुवातीला मुंबई, नाशिक, अकोला अशा बाजारपेठेत त्यांनी माल विकला, तर गेल्या वर्षी थेट बांगलादेशला डाळिंब निर्यात केले. शेतीत यांत्रिकीकरण झाले. त्यातून मिळणाऱ्या पशांवर घराचे अर्थकारण बदलले.

सद्य:स्थितीला गाढेजळगावात ८० ते ९० पूर्णपणे भरलेली शेततळी आहेत. त्यावर सव्वा लाख डाळिंबाची लागवड झालीय. त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपकीच एक शिवाजी भालेकर. कोरडवाहू शेती असल्याने फळबाग करावी, असा विचार नव्हता. मात्र शेततळ्याने चित्र पालटले. मका, तूर, कपाशी घेतली जात होती. त्या शेतात डाळिंबाची बाग आहे. गेल्या तीन वर्षांत डाळिंब शेतीतून ३० लाखांचे उत्पन्न झाल्याचे भालेकर यांनी सांगितले. त्यातून दारात एक बोलेरो गाडी उभी आहे. गेल्या दोन वर्षांत गाढेजळगावातील १५ ते २०  शेतकऱ्यांनी अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या नव्याकोऱ्या चारचाकी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडून मागेल त्याला शेततळे ही योजना राबवली जाते. त्यावर बोलताना, सरकारी योजनेत केलेली आíथक तरतूद पुरेशी नाही. तीस बाय तीसचे शेततळे पूर्ण करायचे म्हटले तर खोदकाम, ताडपत्री, कंपाऊंड आणि इतर खर्च पकडता साधारणत: तीन लाखांचा खर्च येतो. सरकारकडून तेवढी तरतूद केली जात नाही. त्यामुळे फक्त योजना आहे म्हणून काम केले तर काहीही होऊ शकत नाही. त्यासाठी मनात इच्छा असणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये अनेकांनी गावात शेततळी खोदली. सरकार बदलले आणि त्याचे अनुदानही मिळाले नाही. अनुदान मिळाले नाही म्हणून जर तिथेच थांबलो असतो, तर गावाचे नंदनवन झाले नसते, असे भालेकर सांगत होते.

विठ्ठल कुंडलिक ठोंबरे हे अल्प भूधारक शेतकरी. डिसेंबरनंतर त्यांच्या विहिरीला फक्त पिण्यापुरतेच पाणी असायचे. त्यामुळे त्यांनीदेखील शेततळ्यावर डाळिंबचे उत्पादन घेण्याचे ठरवले. जेमतेम एक हेक्टर शेती. त्यात २० गुंठे जमिनीवर त्यांनी शेततळे खोदले. त्यावर एकरभर डाळिंब शेती केली. गेल्या चार वर्षांपासून बाग यशस्वीरीत्या सांभाळली असून वर्षांला साडेदहा लाखांचे उत्पन्न निघाल्याचे त्यांनी सांगितले. फळबागेवर गावात कोटय़वधींची आíथक उलाढाल होते. त्यामुळे इतर उद्योगधंद्यांनाही चालना मिळाली. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. औरंगाबाद-जालना रस्त्यावर गाव असल्याने आलिशान हॉटेल उभे राहिले. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या गणेश सादरे या तरुणाने उभारलेले ‘फूड जंक्शन’ हे लक्ष वेधून घेत आहे.

मराठवाडय़ात सरकारी योजनेतून ३८ हजार १२६ शेततळी करण्यात आले होते. त्यातील १६ हजार ५३४ शेततळे पूर्ण झाले आहेत. ज्यांनी योजनेतून लाभ मिळवला, त्यांच्याही अर्थकारणात मोठा फरक पडला आहे. ज्यांना दुष्काळाशी दोन हात कसे करावेत, हे कळले त्या गाढेजळगावमधील शेतकरी सांगतात, ‘शेततळे जगणेच बदलून टाकते.’

  • मराठवाडय़ात सरकारी योजनेतून ३८ हजार १२६ शेततळी करण्यात आले होते.
  • त्यातील १६ हजार ५३४ शेततळे पूर्ण झाले आहेत. ज्यांनी योजनेतून लाभ मिळवला, त्यांच्याही अर्थकारणात मोठा फरक पडला आहे.
  • ज्यांना दुष्काळाशी दोन हात कसे करावेत, हे कळले त्या गाढेजळगावमधील शेतकरी सांगतात, ‘शेततळे जगणेच बदलून टाकते.’