महाराष्ट्राच्या २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भाजपासोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला होता. दोघांनी पहाटे ७ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भवन येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला. मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता, म्हणून पहाटेचा शपथविधी झाला होता.
या वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे. मुनगंटीवार म्हणाले, २४ ऑक्टोबर २०१९ या दिवशी निवडणुकीचे निकाल येत होते. परंतु त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मनात खुर्चीबद्दलचं प्रेम जागं झालं. सायंकाळी ४ वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुळात ही पत्रकार परिषद संयुक्त व्हायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना बरोबर येऊन पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी एकट्याने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे म्हणाले, आमच्यासहमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीची हत्या केली.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमचा आणि मतदारांचा विश्वासघात केला. त्यानंतर भाजपाने, आमच्या नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना म्हणालो तुम्ही आमच्यासोबत निवडून आला आहात. परंतु ते ऐकले नाहीत. सरकार स्थापन झाल्यावर नाराजी नाट्य होतं आणि अशा घटना घडतात. परंतु यावेळी त्याआधीच सगळं काही घडलं. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो युतीधर्म शिकवला आहे. तो उद्धव ठाकरे यांनी पाळला नाही.
हे ही वाचा >> “पहाटेचा शपथविधी योग्यच होता, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
वरिष्ठ भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विश्वासघातकी भूमिका घेतली. याचा आमच्या मनात राग होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याची तेव्हा संधी मिळाली. अजित पवार यांनी स्वतः स्थिर सरकारसाठी मी आपल्यासोबत येऊ शकतो असा भाव व्यक्त केला. तेव्हा भाजपाने विचार केला उद्धव ठाकरे यांना धडा शिकवणं आवश्यक आहे. अजित दादांनी स्वतः इच्छा प्रकट केली की स्थिर सरकार झालं पाहिजे. उद्धवजी यांची बेईमानी काही लोकशाहीला योग्य नाही. अशा बेईमानीला योग्य वेळी आपण उत्तर दिलं पाहिजे हा भाव त्यामागे (पहाटेच्या शपथविधीमागे) होता.