राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटावर टीकास्र डागलं आहे. ईडी कारवाईच्या भीतीने आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, “ईडी कारवाईच्या भीतीने आपल्यातील काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात, ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही.’ पण, तुरुंगात जावं लागू नये, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.”
“भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता जागा दाखवणार”
“राजकारणात आणि समाजकारणात सत्याची कास सोडून कोणी वागत असेल, तर माझी खात्री आहे, आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. पुढे अडचण आल्याशिवाय राहणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : “शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही”, दिलीप वळसे-पाटलांचा थेट हल्लाबोल; म्हणाले…
“शरद पवारांच्या विचारांत कुठेही ताकद नाही”
याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, “आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते हे घाबरत असल्याचा आशय शरद पवार व्यक्त करतात, तेव्हा मला सहानुभूती वाटते. कारण, यांच्या विचारांत कुठेही ताकद नाहीत. आम्ही आणीबाणीत माफीपत्र दिलं नाही. कितीवर्षे जेलमध्ये राहावं लागेल, याची माहिती नव्हती. तरीही मनात ‘भारत माता की जय’ हीच हुंकार होती. ही संघर्षाची भाव घेऊन जेलमध्ये राहिलो.”
हेही वाचा : “मलाही ईडीची नोटीस येऊ शकते, पण…”, रोहित पवार यांचं विधान
“…याला दोषी ते असतील, असं वाटत नाही”
“तुमच्या पक्षात तुमचे संस्कार असे राहिलेत, की तुम्हीच सांगता ईडीची भीती आमच्या लोकांना वाटते. याला दोषी ते असतील, असं वाटत नाही. दुर्दैवाने, तुमचे सत्तांध संस्कार हेच अशा पद्धतीची वर्तवणूक करायला लावू शकतात”, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर केली आहे.