उसाला जादा दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी अधिक उग्र करण्यात आले. संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर आंदोलनाचे प्रमुख केंद्र असलेल्या कराडमध्येही जाळपोळ आणि दगडफेकीचे सत्र सुरूच राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील बंदमुळे दूध आणि भाज्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने याचा फटका आता मुंबईसारख्या शहरांनाही बसण्याची भीती आहे.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४८ तासांच्या बंदची हाक दिली होती. या बंदच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांतील व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. कोल्हापुरातील ग्रामिण भागात कडकडीत बंद होता, तर शहरी भागात याचा प्रभाव काहीसा कमी जाणवला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्य़ात डझनभर ठिकाणी रास्ता रोको, टायर पेटवून टाकणे, वाहनांवर दगडफेक असे हिंसक प्रकार घडले. सोलापूरमध्ये एसटी बसेसवरील दगडफेकीच्या दोन अनुचित घटनांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्य़ात हे आंदोलन शांततेत सुरू आहे. सांगली जिल्ह्याच्या अंतर्गत भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाखाली आंदोलनात िहसक कृत्ये करण्याचा सल्ला ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिल्याचा आरोप करीत त्यांच्या पुतळ्याचे तासगाव येथे दहन करण्यात आले. प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कराडसह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर, सर्वच रस्ते जाम असून, एसटी वाहतूक पूर्णत: बंद राहताना ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड व दगडफेकीचे प्रकार सुरूच आहेत. यावर पोलिसांचा पवित्राही आक्रमक होत चालला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड चालू ठेवली असून, हिंसक आंदोलनकर्त्यांवर सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2013 रोजी प्रकाशित
पश्चिम महाराष्ट्र धुमसताच!
उसाला जादा दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी अधिक उग्र करण्यात आले.
First published on: 29-11-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane farmers 48 hour bandh in maharashtra