अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुजात यांनी केतकीवर टीका करताना शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलंय.

“अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती,” अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमात सुजात सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर भाष्य केलं. “सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांना मानसिक आरोग्याचाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा,” असं सुजात म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना, “एखाद्याच्या अंगावर, दिसण्यावर टीका करु नका,” असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. “शरद पवारांबद्दल महाराष्ट्रभरात आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणादायी आहेत. कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे,” असं सुजात म्हणाले. केतकीने शरद पवारांवर टीका करताना त्यांचा चेहरा आणि बोलण्याच्या पद्धतीवरुन टीका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुजात यांनी प्रसारमाध्यमांना सल्ला देताना, “मीडियाने सध्या नेत्यांचे प्रश्न आणि उत्तरं, सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा,” असं म्हटलंय. सुजात यांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केलीय.