अहिल्यानगर: ”सिस्पे” घोटाळ्यात श्रीगोंदे, पारनेर, नगर शहरातील गोरगरीब जनतेचे १ हजार कोटी रुपये बुडाले. छोट्या गोष्टींवरून उपोषण, आंदोलन करणारे या विषयावर रस्त्यावर उतरायला का तयार नाहीत? या विषयावर तुम्ही गप्प का आहात? हे कोणाचे कार्यकर्ते होते? याचा सूत्रधार कोण? कोणाच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते पुढे होते? मोटरसायकल वाटपास कोण उपस्थित होते? याची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता दिले आहे. आपल्याकडे याचे व्हिडिओ आहेत, लवकरच पर्दाफाश करू, असा इशाराही त्यांनी दिला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त नगरमध्ये आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सन्मान व शेतकरी दिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिस्पे व इन्फिनिटी हा गुंतवणूकदारांवर दिवसाढवळा टाकलेला दरोडा आहे. या प्रश्नावर एक तरी आंदोलन झाले का, जे छोट्या प्रश्नांवर उपोषणास बसतात, ते का गप्प आहेत. या विषयावर बोलायला कोणी तयार नाही. कोणी सांगितले होते की, या कंपनीचे संचालक माझे नातेवाईक आहेत? याचाही व्हिडिओ कार्यकर्त्यांनी सर्वांना दाखवावा, असेही आवाहन डॉ सुजय विखे यांनी केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत मतांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यासंदर्भात बोलताना माजी खासदार विखे म्हणाले राहुल गांधी निवडणूक आयोगामध्ये झालेला भ्रष्टाचार माध्यमांसमोर मांडतात. खरंतर न्यायालय त्यासाठी उपलब्ध आहेत. तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही न्यायालयासमोर मांडले पाहिजेत. तुमचा न्यायव्यवस्थेवर, देशावर विश्वास नसेल तर जिथून त्यांचा उगम झाला तिथून न्यायाधीश आणून बसवावेत. कारण त्या देशांवर त्यांचा अधिक विश्वास आहे, असा टोला विखे यांनी लगावला.
साकळाई योजनेला पुढील महिन्यात मान्यता
साकळाई पाणी योजनेवरूनही माजी खासदार विखे यांनी खासदार लंके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून साकळाई योजनेसाठी घोषणांचा पाऊस पडतो आहे. पण कामाचा पत्ता लागत नाही. निवडणुका आल्या की घोषणा होतात. मात्र या योजनेसाठी कोणी उपोषण केल्याचे किंवा मंडप टाकून चार दिवस बसल्याचे मला दिसले नाही. आता पुढील महिन्यात या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. भूमिपूजन होईल. ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळेल.
रोहित पवार यांच्यावरही टीका
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना सुजय विखे यांनी रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले इतर लोकांसारखी जिल्ह्याबाहेर लुडबूड करण्याची मला सवय नाही. जे जिल्हा बाहेर फिरत होते त्यापैकी काही ५०० मतांनी आले तर काही पडले. जिल्ह्यात राहून महाराष्ट्राचे पुढारी व्हायचे स्वप्न ते पाहत आहेत. त्यांनी आधी आपल्या तालुक्याचा अभ्यास करावा. तुमचे जिल्ह्यात काही उरलेलं नाही. तालुक्यात काही उरले नाही. तेथूनच सुरुवात करा, ते सोडून ट्रम्पवर चर्चा करतात, हे हास्यस्पद आहे.
उद्धव ठाकरेंचे महत्त्व किती?
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मागील रांगेत जागा देण्यात आली. या प्रकरणावरूनही सुजय विखे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, हा त्यांचा स्वाभिमानाचा भाग आहे. या लोकांना पाचव्या रांगेत जागा मिळाली. मात्र हेच लोक जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे दुसऱ्या रांगेत होते, तेव्हा शिंदे यांची किंमत काढत होते. शिंदे हे तरी दुसऱ्या रांगेत होते, ते पंतप्रधानांच्या मागे उभे होते. परंतु हे लोक आता अशा व्यक्तीच्या मागे आहेत, जे कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे महत्त्व काय आहे, हे स्पष्ट होते.