उष्णतेमुळे चंद्रपूर व ब्रम्हपुरी या दोन शहरांमध्ये पारा ४६ अंशावर गेल्याने आकाशात पक्षी दिसेनासे झाले असून सर्वत्र संचारबंदीसदृश्य चित्र येथे बघायला मिळत आहे. मार्चपासूनच जिल्ह्य़ात उन्हाळा तापायला सुरुवात झाली होती.

गेल्या तीन दिवसांपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर व ब्रम्हपुरी ही दोन शहरे सलग दोन दिवसांपासून देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाही शहरे झाली आहेत. चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश, तर रविवारी ४५.८ अंश तापमान नोंदविले गेले. दिवसागणिक तापमान झपाटय़ाने वाढत आहे.

औद्योगिक शहर असलेल्या चंद्रपुरात वेकोलिच्या ३३ कोळसा खाणी, महाऔष्णिक विद्युत केंद्र, खासगी वीज प्रकल्प, पाच सिमेंट कारखाने व पोलाद उद्योग, आयुध निर्माणी कारखाना आणि केमिकल उद्योग आहेत, त्यामुळेच या तापमानात दरवर्षीच्या तुलनेत अधिक वाढ झालेली आहे. १५ एप्रिलला ४४.६ अंश व १६ एप्रिलला ४४.८ अंश व त्यानंतर तो ४५ अँसावर गेला. दरम्यान मधल्या दिवसात ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाला, परंतु आता पुन्हा उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.

शनिवार व रविवारी अनुक्रमे ४६ व ४५.८ अंश तापमान राहिल्याने नागरिकांची रस्त्यांवरील गर्दी फार कमी दिसून येत आहे. उष्णतेमुळे लोक घराबाहेर पडनासे झाले आहेत. गेल्या आठवडय़ापासूनच तापमान ४५ अंशावर आहे. आता नवतपा सुरू होताच हे तापमान आणखी वाढते राहील. मागील वर्षी मे महिन्यात जिल्ह्य़ात ४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका बाजारपेठेला बसला आहे.

शहरातील मुख्य बाजार ओस पडला असून चंद्रपुरात पाहुणे येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. याउलट चंद्रपुरातून थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे.