सुजित तांबडे

पती अजित पवार पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम दुरावत असताना चिरंजीव खासदार व्हावा, असा मातृहट्ट करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलाला थेट मावळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास लावलेल्या सुनेत्रा पवार यांना आपल्यावरच खासदारकीची निवडणूक लढविण्याची वेळ येईल, हे स्वप्नातही वाटले नसेल. पण बदललेल्या  परिस्थितीने त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुलगा पार्थला खासदार झालेला पाहण्याऐवजी त्यांनाच रणांगणात उतरावे लागले आहे.

हेही वाचा >>> सातारची जागा राखण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना गळ! जयंत पाटील- पृथ्वीराज चव्हाणांमध्ये तासभर खलबते

सुनेत्रा पवार यांना माहेरचा राजकीय वारसा आहे. त्यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव आहे. माजी खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकारण हे त्यांनी लहानपणापासून जवळून पाहिले आहे. मात्र, प्रत्यक्ष राजकारणात त्या आजवर कधीही उतरल्या नव्हत्या. आतापर्यंत त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. बारामती हायटेक टेक्सटाइल पार्क या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तीन हजारांहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. इन्व्हायर्नर्मेटल फोरम ऑफ इंडिया या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्याही त्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक लाखांहून अधिक झाडे लावण्याचे काम केले आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाळण्यासाठी जनजागृती, सायकल वापराचा प्रसार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न हे त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान आहे.

हेही वाचा >>> केशर आंबा यंदा महिनाभर आधीच बाजारात; मुंबई, पुण्यात दर किती ?

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी अधिसभा सदस्य या माध्यमातून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले आहे.  महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्री अ‍ॅण्ड रुरल टुरिझम फेडरेशन (मार्ट) ही संस्था स्थापन करून त्यांनी शेतीच्या क्षेत्रात काम केले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रात काम करत असलेल्या सुनेत्रा पवार या आतापर्यंत सक्रिय राजकारणात कधीही आल्या नाहीत. पवार कुटुंबातील रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर आपला चिरंजीवही राजकारणात यावा, असा हट्ट त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धरल्याची आणि त्यावरून पवार कुटुंबामध्ये कलह झाल्याची चर्चा होती. अखेर सुनेत्रा पवार यांच्या आग्रहाखातर चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उभे करण्यात आले होते.