अलिबाग – संजय राऊत यांच्‍या मनावर इतका परीणाम झाला आहे की त्‍यांची आता मानसिकता तपासण्‍याची गरज आहे अशी टीका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली. आज अलिबाग येथे महायुतीच्‍या समन्‍वय मेळाव्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

एकाने काकाचा पक्ष चोरला तर एकाने पक्ष आणि बाप चोरला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली या संदर्भात माध्यमांनी विचारले असता, तटकरे बोलत होते.

हेही वाचा – “अजितदादांचे घड्याळ कधीच…” महायुतीच्या मेळाव्यात नरहरी झिरवाळांचं विधान

राजकारणात वेगवेगवेळ्या भूमिका का घ्‍याव्‍या लागल्‍या हे स्‍पष्‍ट आहे. अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वात आम्‍ही जो निर्णय घेतला यासंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्‍या कक्षेत आहे. लवकरच आयोग तो जाहीर करेल. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठाने आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भातील निर्णय गुणवत्‍तेच्‍या कसोटीवर दिेलेला आहे. नैराश्‍येपोटी वैफल्‍य आल्‍यानंतर उव्दिग्‍नता कशी येते ही आता संजय राऊत आणि आमच्‍या काही सहकाऱ्यांच्‍या तोंडातून ऐकायला मिळते आहे, असे तटकरे म्‍हणाले.

आम्‍ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्‍या कसोटीवर कसा टिकेल याची पूर्णपणे खबरदारी घेवून घेतला आहे. यात सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ, निवडणूक आयोग यांचा आम्‍ही विचार केला. दोन दिवसांत सुनावणी सुरू होणार आहे. यासंदर्भात आमच्‍यामागे दिल्‍लीतील अदृश्‍य शक्‍तींचे हात आहेत असे वायफळ आरोप होवू नयेत म्‍हणून याबाबत मी भाष्‍य करू इच्छित नाही, असे तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – “काँग्रेसमधील उर्वरित चांगले नेतेही भाजपची वाट धरतील”, प्रवीण दरेकर यांचा दावा; म्हणाले, “४०-५० वर्षे जे..”

आज ज्‍या प्रमाणे राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यांत महायुतीचे मेळावे झाले तसेच मेळावे राज्‍यातील सहा महसूल विभागांमध्‍येदेखील घेतले जाणार आहेत. याशिवाय राज्‍यस्‍तरीय मेळावा मुंबई किंवा नवीमुंबईत घेण्‍याचा मानस आहे. यासंदर्भात मुख्‍यमंत्री, दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री आणि प्रदेशाध्‍यक्ष एकत्रित बसून याबाबत लवकरच निर्णय होईल, असे तटकरे यांनी सांगितले.