हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. निवडणुकीपुरती आघाडी मान्य नसल्याची भूमिका माजी खासदार शिवाजी माने यांनी व्यक्त केली. उमेदवाराला गरज असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी, असा सल्ला देण्यात आला. आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी मात्र ‘आघाडी’चा धर्म पाळू, असे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित बैठकीस माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी हजेरीदेखील लावली नाही. काँग्रेसला हिंगोलीची जागा सोडण्याच्या निर्णयाला स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विरोध करीत आहेत. माजी खासदार शिवाजी माने म्हणाले, घेतलेला निर्णय चुकीचा आहे. उमेदवाराला गरज असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. त्यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका ठेवू. निवडणुकीपूर्वीची आघाडी मान्य नाही. त्यांना आमची गरज असेल, आम्हाला त्यांची गरज नाही, असेही माने म्हणाले.
पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसला जागा सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. शेजारच्या मतदारसंघात राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला तर आम्हीदेखील सहकार्य करू, असे मत नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी खासदार शिवाजीराव माने स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्याच्या विचारात आहेत. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा होती.