शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं यासंदर्भात निवडणूक आयोगानं आधीच निर्णय दिला आहे. त्यानुसार ते शिंदे गटाला मिळालं आहे. मात्र, आता शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात प्रदीर्घ काळ सुनावणी झाल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यायमूर्ती शाह निवृत्त होणार
येत्या १६ तारखेला न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीच्या खंडपीठामध्ये शाह यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधीच या प्रकरणाचा निकाल लागणं अपेक्षित आहे. येत्या १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये ११ किंवा १२ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, असा दावा केला आहे.
कायदेशीर शक्यता आणि निकालाचा अंदाज
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या खटल्याची प्रदीर्घ अशी सुनावणी झाली आहे. त्यावरून असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. त्यानुसार पहिली शक्यता म्हणजे आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणं सोपा निर्णय म्हणून अवलंबला जाऊ शकतो. दुसरी शक्यता म्हणजे बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो.
असीम सरोदेंनी व्यक्त केलेली तिसरी शक्यता म्हणजे पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट न्यायालयच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते. यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.
यातील चौथी शक्यता असीम सरोदेंनी मोठ्या घटनापीठाची वर्तवली आहे. “एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते”, असं असीम सरोदेंनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.