“आज मोठा दिलासा आम्हा सगळ्यांना मिळाला आहे. ज्या निर्णयाची स्थगिती समोरचे लोक मागत होते ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही,” अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत निवडणूक आयोगासमोरची सुनावणी थांबवता येणार नाही असं म्हटलं आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. या निर्णयामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंनी CM पदाचा राजीनामा दिल्याचा शिंदे गटाला होणार फायदा?; सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला मुद्दा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. याच निकालानंतर प्रसारमाध्यमांशी श्रीकांत शिंदेंनी संवाद साधला. “हा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया शिंदेंच्या पुत्राने दिली आहे. “घटनापीठाची स्थापना झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच सुनावणी आहे. न्यायालयात नेहमी सत्याचा विजय होतो. सत्याच्या बाजूने निकाल दिले जातात,” असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी या निर्णयाचा स्वागत केलं.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान

“निवडणूक आयोग आणि न्यायालय या वेगळ्या गोष्टी आहेत असं आम्ही आधीपासून सांगत होते. तेच आज न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने निवडणूक आयोगाला थांबवू शकत नाही असं सांगितलं आहे. हे आमचं मोठं यश,” असं मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Thackray vs Shinde SC Case: …तर शिंदेच अपात्र ठरतील अन् महाराष्ट्रातील सरकार पडेल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्या जे आकडे आहेत ती खरी परिस्थिती आहे. ७५ टक्के आमदार, खासदार, लोकप्रिनिधि, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी शिंदेसाहेबांबरोबर आहेत” असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना श्रीकांत यांनी, “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचं कोण काम करतंय हे सर्वजण पाहत आहेत. मी न्यायालयाला धन्यवाद देतो. हा निर्णय दिल्याने निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे,” असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.