मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे १९८६ बेळगावमध्ये झालेल्या आंदोलनाचीही आठवण सांगत राज्य सरकारला टोला लगावला आहे. शरद पवारांनी १९८६ च्या आंदोलनात पोलीसांच्या लाठ्या खाल्ल्या, पण माघार घेतली नाही, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरू झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. त्यांनी कर्नाटकमध्ये जाऊन पोलीसांच्या लाठ्या झेलल्या, पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील शरद पवारांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“१९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला”

पुढे त्यांनी १९८६ मध्ये बेळगावात झालेल्या आंदोनलची आठवण करत, राज्य सरकारला टोला लगावला. “कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस.एम. जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं गेलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.”, असेही त्या म्हणाल्या.

“पोलिसांना चकमा देऊन शरद पवार बेळगावात पोहोचले”

“पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होतं. बेळगावात दाखल होण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यांना काहीच कळलं नाही. शरद पवार बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.”

“शरद पवारांसह आदींना बेदम मारहाण”

“बेळगावात जमावबंदी होती. शरद पवार पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलीस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – “यापुढे काश्मिरी हिंदूंना टार्गेट केल्यास…” विवेक अग्निहोत्रींनी दिला थेट इशारा

“शरद पवारांच्या पाठीवरचे वळ बघून…”

“त्यानंतर शरद पवारांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. एस.एम. जोशी शरद पवारांना भेटायला गेले. त्यांनी त्यांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते”, असेही त्यांनी सांगितले. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticized on minister belgaon visit remember sharad pawar 1986 agitation spb
First published on: 06-12-2022 at 11:24 IST