scorecardresearch

“घाणेरडं राजकारण कुठेतरी थांबलं पाहीजे, सर्वपक्षीय नेत्यांशी बोलायला तयार”, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं मत

राज्यात केतकी चितळे असो कि नवनीत राणा यासह विविध विषयावरून राजकारण सुरू आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Supriya-Sule-2
"घाणेरडं राजकारण कुठेतरी थांबलं पाहीजे, सर्वपक्षीय नेत्यांशी बोलण्यासाठी तयार", सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं मत

राज्यात केतकी चितळे असो कि नवनीत राणा यासह विविध विषयावरून राजकारण सुरू आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. “अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. हे सर्व थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील मध्यस्थी करेन , मी सर्वांशी बोलायला तयार आहे.” असं सांगत सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावरही अंडी फेकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. “असं बोलणे अत्यंत वाईटच असल्याने यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी सर्वांनी निषेधाची भूमिका नोंदवली होती. याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे तसेच प्रत्येक पक्षातील नेत्यांशी बोलायला तयार आहे.”,असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये बोलताना म्हटले होते की, पेट्रोल डिझेलवर राज्याचा टॅक्स हा जास्त आहे. त्यामुळेच राज्यात पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले आहेत. गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, “गिरीश महाजन यांचा राष्ट्रीय स्तरावर खूप अभ्यास असून ते अभ्यासू व्यक्ती आहे,असं ते म्हणू शकतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule express on state politics rmt