सोलापूर : ‘‘मी आणि अजित पवार दररोज शरद पवार यांच्या संपर्कात असतो,’’ हा प्रफुल पटेल यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी फेटाळला. पटेल यांचा दावा वास्तव नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
सोलापुरात रविवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत खासदार सुळे यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. प्रफुल पटेल यांनी आपण स्वत: आणि अजित पवार दररोज शरद पवार यांच्या संपर्कात असतो, असा दावा केल्याच्या वृत्ताकडे खासदार सुळे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. त्या म्हणाल्या, की माझा आणि शरद पवार यांचा भ्रमणध्वनी, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम वा अन्य कोणत्याही प्रकारच्या माध्यमावरील संभाषणाचे ध्वनिमुद्रण होत असावे. कारण आजचा जमानाच खराब आहे. आमचे भ्रमणध्वनी वा अन्य कोणत्याही माध्यमातून होणारे संभाषण कोणीही पडताळून पाहू शकते. पटेल यांचा दावा फेटाळताना सुळे म्हणाल्या की, आम्ही कुठल्याही प्रकारे पटेल यांच्या संपर्कात नाही. आम्ही मधल्या काळात त्यातल्यात्यात सुवर्णमध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला. पण त्या सगळय़ांनी अगदीच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायचे ठरवले. त्यामुळे तो संपर्कही आता नाही. त्यामुळेच पटेल हे स्वत: आणि अजित पवार दररोज शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगतात, त्यात आमच्या दृष्टीने काहीही वास्तव नाही. वास्तव काय आहे ते पटेल यांनाच विचारावे लागेल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>ऊसाला ५ हजार रुपये दर द्यावा अन्यथा कारखान्यातील अंतराची अट काढावी; शेतकरी संघटनेच्या परिषदेत ठराव
पटेल यांच्यापासून छगन भुजबळांपर्यंत सर्वजण शरद पवार यांच्याविषयी ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, ते पाहता या सर्वाना पक्षाची दारे कायम बंद ठेवली जातील का, या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या,‘‘त्याबाबतची भूमिका पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच मांडू शकतील.’’
फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापेक्षा उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागते. त्यांच्यावर भाजपकडून अन्यायच झाला आहे. त्यांनी काँग्रेस विचारांचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आग्रह धरला आहे, त्याचा आनंदच वाटतो. आता काँग्रेसमुक्त भारत तर विसरा, पण भाजपचे जास्त आमदार निवडून आले तरी फडणवीस यांना काँग्रेस विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे. त्यांच्या या दिलदारपणाचे आणि त्यागाचे स्वागतच करायला हवे, असा टोला खासदार सुळे यांनी लगावला.
आम्ही पटेल यांच्या संपर्कात नाही. मधल्या काळात सुवर्णमध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी खालच्या पातळीवरील राजकारण करायचे ठरवले. त्यामुळे तो संपर्कही आता नाही.- सुप्रिया सुळे, खासदार