Supriya Sule : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी पुन्हा हातमिळवणी करण्याबाबत, टाळी देण्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विविध राजकीय पडसाद उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत वक्तव्य केलं आहे. ऱाज ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष सोडला आणि मनसेची स्थापना केली. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी प्रयत्न झाले, त्याबाबतच्या विविध चर्चाही झाल्या. आता राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सूचक मानलं जातं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“प्रश्न असा आहे की कुठल्याही मोठ्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद (ठाकरे बंधू) आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद आणि भांडणं या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आणि तो माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही. सगळ्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांतील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा हे माझं म्हणणं आहे. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंशिवाय मी कुणाच्या हाताखाली काम करत नव्हतो. उद्धव बरोबर काम तेव्हाही करत होतोच. आता समोरच्यांची इच्छा आहे का की मी बरोबर काम करावं?” असा सवाल राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत विचारला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद काय?
“अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळी सांगत होतो की गुजरातमध्ये महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि महाराष्ट्रातही त्याच विचाराचं सरकार बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग परत तडजोड करायची असं नाही. महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचं स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा.”
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. ही बातमी बघितल्यावर मी दोघांनाही संपर्क साधला. इतका आनंद झाला आहे मला. आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच ते सहा दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही आम्हाला प्रिय आहेत. आज एकत्र आहेत ही चांगली बाब आहे. आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला सोनेरी दिवस आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवार कुटुंब एकत्र येईल का? विचारताच एका ओळीत उत्तर
महाराष्ट्रासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू एकत्र असतील तर ही समाधानाची बाब आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याचं मी स्वागत करते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पवार कुटुंब एकत्र येईल का असं विचारलं असता त्यांनी पांडुरंगाची इच्छा एवढंच उत्तर दिलं. नाती जोडण्यासाठी कुणी मनापासून प्रयत्न करत असेल तर मी त्याचं स्वागतच करेन. प्रत्येक गोष्ट व्यवहारासाठी नसते. प्रेमही महत्त्वाचं असतं आणि प्रेम ही आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाची गोष्ट आहे.