Supriya Sule Speech at Dindori remark Non Vegetarian Diet : “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. मांसाहारावरून वेगवेगळी वक्तव्ये करणाऱ्या महायुतीतील नेत्यांवर खासदार सुळे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. दिंडोरी येथील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही”, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, खासदार सुळे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यावर प्रतिक्रिया देणार नाही, महाराष्ट्रातील तमाम वारकरी यावर उत्तर देतील.”
मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं : खासदार सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी ‘राम कृष्ण हरी’वाली आहे. केवळ मी तुळशीची माळ गळ्यात घालत नाही एवढाच फरक आहे. कारण मी कधीकधी मांसाहार करते. मी इतरांसारखं खोटं बोलत नाही आणि मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं. मग तुम्हाला काय अडचण आहे?
“आपण कोणाला मिंधे नाही”
“माझे आई-वडील मटण खातात, सासू-सासरे खातात, माझा नवरा देखील खातो. आम्ही आमच्या पैशाने खातो. यात इतरांना अडचण असण्याचं कारण नाही. आम्ही काही उधार आणून खात नाही. जे आहे ते आहे. आपण कोणाला मिंधे नाही. जो है वह डंके की चोट पे हैं, तो दिल खोल के करो. आम्ही मटन खातो तर खातो.”
मटण खाल्लं तर काय पाप केलं का? सुप्रिया सुळे यांचा सवाल
खासदार सुळे म्हणाल्या, “एकदा कुठेतरी मी गेले होते. तिथे मटण खाल्लं तर सुप्रिया सुळेंनी मटन खाल्लं, मटण खाल्लं अशी चर्चा केली गेली, ते सगळं व्हायरल केलं गेलं. अरे? खाल्लं तर खाल्लं, मी काय पाप केलंय का?”
महाराष्ट्रातील वारकरी यावर उत्तर देतील : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, “मी याचे उत्तर देणार नाही, महाराष्ट्रातील तमाम वारकरी यावर उत्तर देतील.”