Supriya Sule on Vice President Election: देशात उपराष्ट्रपतीपदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. मतदानाच्या आधीपासूनच भाजपाप्रणीत एनडीएकडे विजयी आघाडी असल्याचे आकडे दिले जात होते. निकालदेखील एनडीएच्या बाजूने लागला असून सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मात्र, या निकालापेक्षाही सध्या चर्चा आहे ती निकालाच्या अनुषंगाने होणाऱ्या दावे-प्रतिदाव्यांची! एकीकडे भाजपाकडून क्रॉसवोटिंगचा दावा केला जात असताना आता त्यावर सुप्रिया सुळेंनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. प्रसारमाध्यमांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झालेलं क्रॉसवोटिंग व ते नेमकं कोणत्या पक्षाचं झालं याबाबतचे सत्ताधारी भाजपाचे दावे यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी मतांचं गणित मांडलं.
क्रॉसवोटिंगवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी यावेळी भाजपा नेते संजय जयस्वाल यांच्या विधानाचा दाखला दिला. “किती मतं फुटली? त्यांना जी १५ मतं जास्त मिळाली, ती शिवसेनेचीच होती हे त्यांनी मार्क केलं होतं का? हे मतदान गुप्त होतं. मग तुम्हाला कसं कळलं की ती मतं राष्ट्रवादीची होती की शिवसेनेची? काल भाजपाचे वरीष्ठ नेते संजय जयस्वाल यांनी विधान केलं की ४० मतं फुटली. ते म्हणतात ४० मधली ११ मतं वायएसआर काँग्रेसची आहेत. वाएसआर काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मित्रपक्ष नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“५ वर्षं जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते भाजपाचा मित्रपक्ष आहेत. भाजपाने मित्रपक्ष बदलला. त्यांचे मित्रपक्ष त्यांच्या सोयीने बदलतात. जी ४० मतं ते आमच्या माथी मारतायत, त्यातली ११ मतं त्यांच्याच मित्रपक्षाची आहेत. भाजपा त्यांच्या सोयीने मित्र बदलते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“ही तर वोटचोरी”
दरम्यान, गुप्त मतदान होऊनही कुठल्या पक्षाची किती मतं फुटली याचे दावे करणे म्हणजे वोटचोरीच असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. “मला मतदानासाठी दिलेल्या कागदावर कुठलाही क्रमांक किंवा रंग नव्हता. तिथे पांढराच रंग चालतो. जर हे गुप्त मतदान होतं, तर मग यांना कसं माहिती की कोणती मतं फुटली? यात काहीतरी गोलमाल दिसतोय. सत्तेतल्या लोकांना जर माहिती आहे की कुणाचं मतदान कुठे झालं, तर याचा अर्थ ही वोटचोरीच आहे”, असा आरोप त्यांनी केला.
“१४ क्रॉसवोटिंग कोणत्या राज्यातून झालं? जर गद्दारी केली तर ती फक्त मराठी माणसानं केली असा त्यांना आरोप करायचा आहे का? १४ मतं फुटली म्हणजे ती महाराष्ट्राचीच फुटली असं कसं म्हणता येईल?” असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
?डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे
— Supriya Sule (@supriya_sule) September 10, 2025
⏭️ 10-09-2025 ➡️ सरकारच्या दडपशाही विरोधात आयोजित जनआंदोलनातून लाईव्ह https://t.co/NBh9UCvvVU
तीन वेळा सराव करूनही…
दरम्यान, मतदानाचा तीन वेळा सराव करूनही भाजपाची १० मतं अवैध कशी ठरली? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी केला आहे. “१५ मतं अवैध ठरली. त्यातली १० भाजपाची आहेत असं तेच सांगतायत. तीन वेळा प्रॅक्टिस केली मतदानाची. एक दांडी काढायची होती फक्त. ग्रामपंचायत किंवा कारखान्याच्या मतदानाला खूप क्लिष्ट प्रक्रिया असते. आमचे लोक कसे मतदान करत असतील? तीन तीन वेळा सराव करूनही हे १० खासदार कशी चूक करू शकतात? फक्त एक दांडी काढायची होती. त्यातही चूक कशी होऊ शकते? मतं अवैध ठरली हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे”, असं त्या म्हणाल्या.