ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. राज्य सरकारने रविवारी (१६ एप्रिल) या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. नवी मुंबईतल्या खारघर येथील सेंट्रल पार्क येथे हा कार्यक्रम पार पडला. दुपारच्या रणरणत्या उन्हात ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ‘श्री सदस्य’ हा सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने जमले होते. परंतु या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर पुरस्काराचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. या सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. त्यामुळे अनुयायांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. उपचाराधीन असलेल्या अनुयायांचा खर्च सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
हे ही वाचा >> “महायुतीत अजित पवार…”, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, म्हणाले, “भाजपा आणि आमचं टार्गेट सेट”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर झाली असली तरी माणसाची किंमत पाच लाख रुपये इतकी होऊ शकत नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, “या कार्यक्रमाचं नियोजन करताना सर्वांनी संवेदनशीलपणा दाखवायला हवा होता. कारण माणसाची किंमत पाच लाख रुपये नसते. ज्याच्या घरातला प्रेमाचा माणूस गेला आहे, त्याचं दुःख या पैशाने मोजता येत नाही. कालच्या कार्यक्रमाचं आयोजन हा खूप असंवेदनशील प्रकार होता. महाराष्ट्र हा कार्यक्रम कायम लक्षात ठेवेल.”
