इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या …

यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत.

गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून संतापजनक टीका होत आहे. यामध्येच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशाप्रकराची अंधश्रद्धा पसरवली जाणं हे दुर्दैवी आहे. किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे.’

राज्यातील वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न असून फक्त कायदे कडक करून हा प्रश्न सुटणार नाही, तर समाजात प्रबोधन करण्याची गरज असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. घरगुती अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने बीजमाता राहीबाई पोपेरे, हिवरे बाजार पॅटर्नचे जनक पोपटराव पवार, क्रिकेटपटू झहीर खान या पद्म पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. झहीर यांच्या वतीने त्यांच्या आई झकीया खान व वडील बख्तियार खान यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा सौ. अनुराधा आदिक, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Supriya sule taking about indurikar maharaj statement nck

ताज्या बातम्या