मंगळवारी रात्री ११.३० ची वेळ. सावित्री नदीवरील पुलाशेजारी राहणाऱ्या सूरजकुमारने रात्री जेवण केले आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी फोन उचलला. बोलता-बोलता तो खिडकीजवळ आला. पोलादपूरकडून येणाऱ्या वाहनांचे हेडलाइट्स चमकत नदीत अचानक नाहीसे होत असल्याचे त्याला दिसले. वाहने गायब होत असून, मोठा आवाजही होत असल्याचे त्याने ऐकले. मुसळधार पाऊस आणि फुत्कारणाऱ्या लाटांची तमा न बाळगता सहकारी वसंतकुमारला सोबत घेऊन त्याने तात्काळ पुलाच्या दिशेने धाव घेतली. हा पूल कोसळल्याचे पाहताच हादरलेल्या या दोघांनी महाडच्या दिशेने येणारी वाहतूक रोखून धरली. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक वाहने आणि प्रवासी बचावले. या पुलाशेजारी शिवकृपा मोटर्स कंपनीचे कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. सूरजकुमार तेथेच राहतो. कंपनीचे व्यवस्थापक लालू गुप्ता यांना या दोघांनी पूल कोसळल्याची माहिती दिली. गुप्ता यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार सस्ते यांना दूरध्वनीवरून कळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सस्ते यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक रोखून धरली. सूरजकुमार आणि त्याच्या सहकाऱ्याच्या सतर्कतेमुळे या मार्गावरून महाडच्या दिशेने येणारी वाहने आणि प्रवासी बचावले. सूरजकुमार आणि वसंतकुमारच्या प्रसंगावधानतेचे यंत्रणेने कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj kumar save people life in savitri river bridge accident
First published on: 04-08-2016 at 01:33 IST