महापालिका घरकुल गैरव्यवहारातील मुख्य संशयित आमदार सुरेश जैन यांना मुंबईच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यानंतर त्यांना मंगळवारी पहाटे विशेष रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा कारागृहात आणण्यात आले. जैन यांच्याबाबत १२ नोव्हेंबर रोजी न्यायालयाचा निकाल अपेक्षित असताना त्यांना तत्पूर्वीच आणल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
घरकुल घोटाळ्यात १० मार्च २०१२ रोजी अटक झाल्यानंतर प्रथम जैन यांनी नऊ दिवस पोलीस कोठडीत घालविले. त्यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना अमळनेर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना नाशिकरोड किंवा औरंगाबाद तुरुंगात हलविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, जैनसमर्थकांनी जिल्हा रुग्णालयासह शहरात गोंधळ घातल्याने तसेच जैन यांनी हृदयाचे दुखणे पुढे केल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईत हलविण्यात आले. २३ मार्च २०१२ पासून जैन हे उपचाराच्या नावावर मुंबईत गेल्यापासून विविध व्याधींच्या कारणास्तव कोठडीऐवजी रुग्णालयातच दाखल आहेत. जामिनाच्या कामकाजासाठीही ते जळगावात आले नाहीत.  जैन यांचे जामीन अर्ज जिल्हा, उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावले. त्यामुळे जैन यांचा मुक्काम कोठडीऐवजी रुग्णालयातच वाढला.