किल्ले सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ही महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे. यासाठी राज्यासह केंद्र शासन प्रयत्नशील असून निधीची तरतूद व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक वास्तूंना पर्यटनाची जोड देऊन त्या जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाला निश्चितच केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे बोलताना केले.
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन प्रेरणोत्सव नव्हे तर संकल्पाचा उत्सव आहे, असे सांगताना राज्याला लाभलेला अर्थमंत्री चांद्याचा तर राज्यमंत्री बांद्याचा आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. देशातील अन्य राज्यांनी शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकार निश्चितच सहकार्य करेल तसेच गड-किल्ल्यांची दुरुस्ती केली नाही तर आम्हाला मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाही, असे सांगत मंत्री मुनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य महाराजांचा वारसा जतन करण्यासाठी केले जाईल, असे स्पष्ट केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन सोहळा सिंधुदुर्ग महोत्सवाचे उद्घाटन टोपीवाला बोìडग मदान येथे करण्यात आले. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय िशदे, प्रमोद जठार, प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजू केनवडेकर यासंह अन्य मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते.
मंत्री मुनगंटीवार यांना केंद्राकडून सिंधुदुर्गसाठी दर वर्षी ९९ कोटी प्राप्त होणार आहेत. तर किल्ल्यातील पर्यटन सुविधांसाठी एक कोटीचा निधी प्राथमिक स्तरावर देण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. विनायक राऊत, वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केले व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu comment on maharashtra historical monuments
First published on: 24-04-2016 at 01:16 IST