आत्मसमर्पण योजनेला नऊ वर्षांत भरघोस यश

गडचिरोलीतील ४२० नक्षलवाद्यांसह गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ांतील ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे.

गडचिरोलीतील ४२० नक्षलवाद्यांसह गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ांतील ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात पती-पत्नी म्हणून काम करणाऱ्या ३० जोडप्यांचाही समावेश आहे. या नक्षलवाद्यांनी ८२ बंदुका, ११० काडतुसे, १ हँडग्रेनेड अशी शस्त्रे,स्फोटके समर्पित केली असून हे यश पाहता राज्य सरकारने आत्मसमर्पण योजनेला २८ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नक्षल चळवळीत भरकटलेले आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी गृह विभागाने २९ ऑगस्ट २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी व विकासासाठी नक्षल चळवळीत सहभागी व्हा, अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांच्या अनेक भुलथापांना बळी पाडून भोळय़ाभाबडय़ा आदिवासींना चळवळीत ओढले. नक्षलवाद संपुष्टात यावा, यासाठी गडचिरोली पोलिसांनी वेगवेगळ्या रणनितीचा वापर सुरू केला. नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून जबाबदार नागरिक बनविण्यासाठी नक्षलवादी आत्मसमर्पण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याला घर किंवा घरासाठी भूखंड आणि आर्थिक मदत देण्यात येत आहे. गडचिरोलीतील ४२० समर्पितांपैकी ३६७ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव असून यापैकी १७० प्रस्ताव मंजूर आहेत, तर उर्वरित प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही सुरू आहे. पुनर्वसन प्रस्तावांमध्ये घरासाठी भूखंड, घरकूल, व्यवसाय उभारणीसाठी बँकांचे अर्थसहाय्य, शेती कसण्यासाठी बैलजोडी, बैलबंडी, डिझेल इंजिन, शेळीपालन व्यवसायाचा समावेश आहे.
योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत ९ टप्प्यात ४२० नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात १ स्टेट झोनल कमेटी सदस्य, ५ डिव्हिजनल कमेटी सदस्य, १३ कमांडर, १७ उपकमांडर, १६६ दलम सदस्य, १०१ क्षेत्रीय, ग्रामरक्षक दल सदस्य, ११७ संगम सदस्य यांचा समावेश आहे. सर्वाधिक १३३ नक्षलवाद्यांनी २००८ मध्ये आत्मसमर्पण केले. ही योजना सुरू झाल्यापासून २०१३ च्या नवव्या टप्प्यात सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले, हे विशेष. आत्मसमर्पण करणाऱ्या सदस्याला त्यांच्या पदानुसार रोख रक्कम बक्षीस म्हणून, तर शस्त्रासह आत्मसमर्पित होणाऱ्या नक्षलवाद्यास बक्षिसाव्यतिरिक्त अतिरिक्त सहाय्य देण्यात आले आहे. त्यात संगम सदस्याला ५ हजार रुपये, तर विभागीय कमांडर, सदस्य आणि त्यावरील सदस्यास ४ लाख ते १० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येते. अल्पशिक्षित १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासकीय आयटीआय आणि खाजगी संस्थेमधून वाहनचालकाचे प्रशिक्षण दिल्याने सध्या ते रोजगार मिळवित आहेत. सहा महिला नक्षलवाद्यांनाही शिक्षणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय आयटीआयमधून एका नक्षलवाद्याला इलेक्ट्रीक फिटींगचे आणि ५ सदस्यांना खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून नळ फिटींगचे प्रशिक्षण दिलेआहे. अनेक नक्षल सदस्यांनी गवंडी कामे शिकून बांधकाम क्षेत्रात मिस्त्री व त्यांचे मदतगार म्हणून काम करीत आहेत. काही सदस्य बटई पद्धतीने शेती करीत आहेत. २० सदस्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे. काही सदस्य पोलीस दलात विशेष पोलीस अधिकारी म्हणून, तर काही पोलीस दलात रोजंदारी करीत आहेत. याशिवाय, काही सदस्यांनी सायकल दुरुस्ती केंद्र, पानटपरी, चहा टपरी व भाजी विक्री केंद्र सुरू करून रोजगार मिळविला आहे. राज्य सरकारकडून आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना २ कोटी ७२ लाख ८० हजार ३०५ रुपये, तर केंद्र शासनाच्या सुरक्षाविषयक खर्च योजनेतून ४२ लाख ५० हजार रुपये, असे एकूण ३ कोटी १५ लाख ३० हजार ३०५ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Surrender cum rehabilitation of naxalites gets success in nine years