आडवळणाच्या गावाला टाळून रस्त्यालगतच्या गावात नाममात्र पाऊल टाकायचे, असा प्रकार केंद्रीय पथकाने परभणी जिल्ह्यातही केला. दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुळावर येथील कृषी विभाग उठला आहे. स्थानिक कृषी विभागाने पाहणी करण्यासाठी बागायती क्षेत्राची निवड केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीस आलेल्या पथकाला टाकळी कुंभकर्ण शिवारात अडवले. अखेर पथकाने नमते घेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच शिवाराची धावती पाहणी केली. अवघ्या २० मिनिटांत पथकाने दोन ठिकाणांची पाहणी करून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
मराठवाडय़ातील दुष्काळी भागाच्या पाहणीस आलेले पथक मंगळवारी परळीहून सकाळी ११ वाजता गंगाखेड तालुक्यात आले. साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील मालेवाडी शिवारात पाहणी केल्यानंतर पथक परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्णच्या दिशेने रवाना झाले. पथकप्रमुख प्रवेश शर्मा, केंद्रीय विद्युत विभाग संचालक वंदना सिंघल, कृषी विभागाचे संशोधन अधिकारी व्यंकट नारायण अंजिना, बी. एम. रायपुरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे गुलजारीलाल आदींचा समावेश होता.
दरम्यान, टाकळी शिवारातील आर्वी रस्त्यावरील बागायती क्षेत्राची पाहणी करण्याचे कृषी विभागाने ठरवले होते. कृषी विभागाच्या चाणाक्ष अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या लगोलग व सोयीचे ठिकाण निवडले. इतर शेतकऱ्यांनी यास आक्षेप घेतला. विहिरीच्या सभोवताली ऊस व कापसाचे पीक होते. विहिरीलाही पाणी दिसून आले, तसेच याच बाजूला शेततळे व जवळपासचा सर्वच परिसर बागायती असल्याने केंद्राचे पथक दुष्काळाची पाहणी करायला आले की बागायती शेतीची, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. कोरडवाहू व जेथे काहीच उगवले नाही अशा शेताची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी या वेळी उचलून धरली. त्यामुळे भांबावून गेलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला.
आर्वी रस्त्यावर शहापूर शिवारात टाकळी येथीलच गुलाबराव मोरे यांच्या बागायती मळ्याची निवड केली होती. स्थानिक अधिकाऱ्यांचा ताफा तेथे पोहोचला. सोबत गावातील शेतकरी गेले. परंतु जाताना दोन्ही बाजूंना हिरवागार परिसर दिसत होता. परिसरात लहान-मोठे बंधारे असल्याने या भागात दुष्काळाची दाहकता पोहोचलेली नाही. तूर, ज्वारी व कापूस पीक बऱ्यापकी दिसून येत होते. अधिकारी व शेतकरी यांच्यात याच बाबीवरून पुन्हा वाद झाला. या वेळी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. कोरडय़ा विहिरी या शिवारात नव्हत्या का आणि हाच भाग कसा निवडला, असा सवाल शेतकऱ्यांनी पुन्हा करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परंतु आमच्या ठरलेल्या कार्यक्रमात हीच दोन ठिकाणे आहेत, असे सांगत अधिकाऱ्यांनी ठिकाण बदलण्यास नकार दिला. परिणामी शेतकऱ्यांनी पथकालाच अडवण्याचा निर्णय घेतला. या गोंधळात दुपारचे दोन वाजले. अखेर पथकही मोरे यांच्या शेताजवळ येऊन ठेपले असता शेतकऱ्यांनी वाटेत गाडय़ांचा ताफा अडवला.
शासकीय वाहनांमधून जिल्हाधिकाऱ्यांसह पथकातील अधिकारी शर्मा उतरताच शेतकऱ्यांनी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाहणी करण्याची विनंती केली. या प्रकाराने अधिकारी अवाक् झाले. काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या गाडीवर उभे राहून कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर शेतकरी सांगतील तेथे पथक गेले. ज्वारीची दोनदा पेरणी करूनही न उगवलेल्या सय्यद नजीर सय्यद गुलाब यांच्या कोरडवाहू शेतीची पाहणी केली. चारा-छावण्या सुरू कराव्यात, बँकेचे कर्ज माफ करावे, अशा मागण्या या वेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या. सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असून, त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे थेट अनुदान व संपूर्ण कर्जमाफीची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी केली.
जिल्ह्यात साडेसात कोटी रुपयांचा पीकविमा शेतकऱ्यांनी काढला आहे. त्याचे पसे शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी सांगितले. याच रस्त्यावरील अखील काजी यांच्या शेतात पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. पथक १ वाजून ५० मिनिटांनी या शिवारात दाखल झाले व २ वाजून १० मिनिटांनी परभणीकडे रवाना झाले. संपूर्ण पाहणी २० मिनिटांची, त्यातही गोंधळाची स्थिती अशा वातावरणात दौरा पूर्ण करून पथक वसमतला रवाना झाले. उपविभागीय अधिकारी सुभाष िशदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, तहसीलदार अविनाश रुईकर यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सहभागी होती.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2014 रोजी प्रकाशित
पथकाचा दौरा ठरला ‘वाऱ्यावरची वरात’!
स्थानिक कृषी विभागाने पाहणी करण्यासाठी बागायती क्षेत्राची निवड केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीस आलेल्या पथकाला टाकळी कुंभकर्ण शिवारात अडवले.

First published on: 17-12-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey tour parbhani