Sushil Kedia Challenged Raj Thackeray: मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारी पोस्ट केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच सुशील केडिया यांनी न्यूज १८ लोकमत वाहिनीवर प्रतिक्रिया देताना केलेलं आणखी एक विधान वादग्रस्त ठरलं आहे. राज ठाकरे व एक दहशतवादी यांच्या धोरणात काय फरक आहे? असा थेट सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे केडिया जाणूनबुजून वाद निर्माण करत असल्याचे दावे होत असताना दुसरीकडे केडियांच्या या विधानांची चर्चा होऊ लागली आहे.
काय म्हणाले सुशील केडिया?
सुशील केडियांनी या मुलाखतीमध्ये त्यांच्या सोशल पोस्टसंदर्भात आक्रमकपणे भूमिका मांडली. “मी जर महाराष्ट्रात असेन, तर उद्या कुणी म्हणेल की तुम्हाला झुणका-भाकर खावी लागेल, तुम्हाला मराठी जेवण जेवावं लागेल, तुम्हाला मराठी कपडे घालावे लागतील. याचा काही शेवट आहे का? राक्षसी प्रवृत्ती आहे ही. अहंकाराला जन्म देणं आहे हे. माझ्यासारखेच बना असा एक धर्म आहे जगात. आपलाच धर्म खरा आणि बाकीचे कुठले धर्म हे धर्मच नाहीत असं मानणारा एक धर्म आहे. तो म्हणजे दहशतवाद्यांचा धर्म. तशीच मानसिकता इथे आहे की जर तुम्हाला आमची भाषा येत नसेल, तर महाराष्ट्रातून चालते व्हा”, असं विधान सुशील केडिया यांनी केलं आहे.
“मला महाराष्ट्राचा राग असता, तर मी इथे का राहिलो असतो? मी इथे कम्फर्टेबल आहे म्हणून ३० वर्षांपासून इथे राहतोय. पण आमच्यासारखी भाषा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आमचा अपमान करता, असं म्हणणं हा राक्षसी विचार आहे. हा मानवी विचार नाही”, अशी टीका सुशील केडियांनी केली.
मला ६ भाषा येतात, मराठी चांगली येत नाही – केडिया
दरम्यान, आपल्याला मराठीव्यतिरिक्त इतर ५ भाषा येत असल्याचं सुशील केडिया म्हणाले. “मला ५ भाषा माहिती आहेत. मराठीही माहिती आहे, पण ती व्यवस्थित येत नाही. हिंदी, बांगला, इंग्रदी, गुजराती आणि संस्कृत या पाच भाषा मला येतात. या भाषा मी लहानपणीच शिकल्या होत्या. मी सोशल मीडियावर यासाठी आज बोललो की तुम्ही लोकांना धमक्या देऊन काय सिद्ध करू इच्छिता? जीव घेणार आहात का? सांगा कुठे यायचं आहे? मारा मला. किती लोकांना मारणार तुम्ही?”, असा सवाल सुशील केडियांनी मनसेवर केला.
“तुम्ही अशी मारहाण करून दहशत पसरवत आहात. दहशतवाद्यांचा धर्म आहे. तो सांगतो की आमचाच धर्म अंतिम आहे, दुसरा कोणताही धर्म हा धर्म नाही. तुम्हीही तेच करत आहात. एक दहशतवादी आणि राज ठाकरेंच्या या धोरणात काय फरक आहे?” असं विधान सुशील केडिया यांनी केलं.
काय आहे सुशील केडियांची X पोस्ट?
सुशील केडियांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका करण्यात आली असून आपण मराठी शिकणार नाही, अशी भूमिकाच सुशील केडिया यांनी जाहीर केली आहे. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचं यासंदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणा नाही, काय करायचंय बोल”, असं केडियांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.