काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन पक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेवरून विरोधकांकडून भाजपा आणि शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौरवर यात्रेवरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही सावरकर गौरव यात्रा नाही तर अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानींवरून लोक प्रश्न विचारतील याची भिती वाटते म्हणून त्यांनी ही सावरकर गौरव यात्रा काढली आहे. भाजपाच्या लोकांमध्ये खरंच सावरकरांबद्दल प्रेम असेल तर नाशिकमधलं भगूर हे त्यांचं जन्मस्थळ आहे, त्याची दुरवस्था का झाली आहे? तिथे भाजपाने काय असे मोठे दिवे लावले आहेत. का तिथे मोठं स्मारक उभारलं नाही?
जर खरंच भाजपा नेत्यांमध्ये सावरकरांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना सावरकर गौरव यात्रा काढायची असेल तर आधी त्यांनी अहमदाबादचं (गुजरात) नामांतर सावरकर नगर असं करुन दाखवावं, असं आव्हान अंधारे यांनी केलं आहे.
हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”
भाजपाने संभाजीनगरच्या जनतेला वेठीस धरलं आहे
दरम्यान, संभाजीनगरमधील दंगलीबाबत अंधारे म्हणाल्या की, “संभाजीनगरमध्ये भाजपानं ठरवून महाविकास आघाडीच्या सभेत विघ्न आणण्यासाठी अक्षरश: संभाजीनगरमधील जनतेला वेठीस धरलं आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपानं जाणीवपूर्वक सुरू केला आहे.”