उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी, कट रचणे आणि १ कोटींची लाच देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीया आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. पण, आता शिवसेना ( ठाकरे गठ ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमाशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तीगत वैर नाही. मात्र, अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाल्यावर त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला होता. याप्रकरणात गृहमंत्र्यांच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांकडे सहा खात्यांचा पदभार आहे. एखादं खातं कमी करून थोडं सत्तापिपासूपणा कमी करावा.”
हेही वाचा : “कदम कुटुंब राजकारणात जिवंत राहू नये म्हणून…”, योगेश कदमांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र
“याबाबत सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, आमचे काही मित्र त्यात सामील आहेत. ते मित्र कोण आहेत? याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली पाहिजे. दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतात, जयसिंघानीया हा सर्व पक्ष फिरून आला आहे. भाजपाने जयसिंघानीया शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो ट्वीट केला होता. हा जयसिंघानीया उल्हानगरमध्ये राहतो. तेव्हा तत्कालीन जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे होते. मातोश्रीत जिल्हाप्रमुखांशिवाय प्रवेश मिळत नाही. मग जयसिंघानीयाला मातोश्रीत कोणी आणलं? नक्कीच जिल्हाप्रमुखांनी आणलं असेल, त्याची चौकशी केली पाहिजे,” असं सुषमा अंधारेंनी म्हटलं.
“मग मित्र म्हणून देवेंद्र फडणवीसांनी दिलेला इशारा मुख्यमंत्र्यांकडे रोख धरून होता का? दुसरीकडे उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाची जागा कोणाची आहे. याचीही चौकशी करून गोष्टी पुढे याव्यात. म्हणजे कळेल, कोणाची किती जवळीक आहे. कारण, ही गोष्ट दिसते तशी सोप्पी नाही,” असेही सुषमा अंधारेंनी सांगितलं.