महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अलीकडेच पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. मी अनेकदा शरद पवारांचा सल्ला घेतो, अशा आशयाचं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदेंच्या या विधानवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वक्तव्ये ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील ‘नारायण वाघ’शी मिळतीजुळती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासमोर जो नेता असतो, त्या नेत्याचं कौतुक एकनाथ शिंदे करतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषण करू दिलं नाही? भरसभेत नकार दिलेला ‘तो’ VIDEO व्हायरल

“मी पवारांचा सल्ला घेतो” या एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला असं वाटतं की, शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्यावर कणभरही विश्वास ठेवला नसेल. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून मला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा ‘पार्ट -२’ आठवला. या चित्रपटात मुख्य व्यक्तीरेखा नारायण वाघ आहे. तो ज्याला बघेल त्याला म्हणायचा, साहेब मी प्रत्येक क्षणी तुमचाच फोटो खिशात घेऊन फिरतो. तशी आमच्या एकनाथभाऊंची गत आहे.”

हेही वाचा- ठाकरे-आंबेडकर युतीला राष्ट्रवादीचा हिरवा कंदील? जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे जेव्हा पंतप्रधान मोदींच्या समोर असतात, तेव्हा ते ‘हम मोदी के लोग है’ असं म्हणतात. कधी ते म्हणतात देवेंद्रजी या कलाकारामुळे माझं सगळं बरं झालं. आता ते शरद पवारांबद्दलही तसं बोलले. मला वाटतं, एकनाथभाऊंची ही सगळी वक्तव्ये… नारायण वाघची वक्तव्ये आहेत. यापलीकडे मला त्यावर अधिक वक्तव्य करावं वाटत नाही,” अशी टोलेबाजी सुषमा अंधारेंनी केली.